नागपूर : सध्याचे शैक्षणिक सत्र आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, तर पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यास विलंब असला तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान कक्षाकडून २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे ऑनलाईन मागणी नोंदविली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ७३ हजार ३०८ विद्यार्थ्यांकरिता सुमारे ४.४० कोटींचा निधी अपेक्षित आहे.
शासनाकडून दोन गणवेशासाठी ६०० रुपयांचा निधी प्रत्येक विद्यार्थ्यांवर खर्च करण्यात येतो. जि.प. कडून पुढील २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता २०२१-२२ च्या युडायएसनुसार जि.प.च्या अखत्यारित सर्व १५१५ शाळा, तसेच महापालिकेच्या शाळांतील गणवेशास पात्र ७३ हजार ३०८ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी परिषदेकडे केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रती दोन गणवेशासाठी सहाशे रुपये याप्रमाणे एकूण ४ कोटी ३९ लक्ष ८४ हजार ८०० रुपयांवरील निधी शिक्षण विभागाला लागणार आहे. हा निधी वेळेत उपलब्ध झाल्यास नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्याची अपेक्षा आहे, तर उर्वरित ओबीसी व खुल्या प्रवर्गातील २३ हजार १०९ वर विद्यार्थ्यांपैकी जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांना सेस फंडातून गणवेशासाठी निधीची तरतूद कली जाणार आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जि. प. शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिल्या जातो. गतवर्षी सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशाचे वाटप करण्यात आले होते.