लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका फार्महाऊसजवळील मोकळ्या जागेत बांबूच्या सहाय्याने तंबू बांधत आरोपींनी चक्क जुगारअड्डा सुरू केला होता. पोलिसांनी तेथे धाड टाकत १३ जणांविरोधात कारवाई केली. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांत दोनच्या पथकाने गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
पिटेसूर वस्तीच्या मागील बेग फार्म हाऊसजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास तेथे धाड टाकली असता काही जण जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी सुनिल रम्मू पटेल (४०, महालक्ष्मी नगर, गोरेवाडा), किशोर मधुकरराव मेघरे (५३, अखाडा चैक, वर्धा रोड, सोमलवाडा), रंजीत त्र्यंबकराव राऊत (५४, पंचशीलनगर), मयुर गंगाधर ठवरे (३६, हिवरीनगर), संजय गजानन मोहरले (४७, रामबाग, ईमामवाडा), हरीश रामदास खिलवानी (५६, एमआयजी काॅलोनी, जरीपटका), धरमपाल शिवराम धमके (४२, राहुल नगर, सोमलवाडा), घनश्याम
चेतनदास साधवानी (५१, दिया अपार्टमेंट, जरीपटका), सौरभ राधेश्याम बावणे (२१, मस्कासाथ, पाचपावली), नविन सुरेश गौर (२९, हंसापुरी, लोधीपुरा), हितेश फुलचंद्र करवाडे (३४, जुना बगडगंज, कुंभार टोली, लकडगंज), व सुधीर भाऊराव धुमाळे (३५, गोरेवाडा जुनी वस्ती) यांचा त्यात समावेश होता. पोलिसांनी विचारणा केली असता गणेश उर्फ घुई आनंदराव चाचेरकर (३५, गोरेवाडा) हा जुगारअड्डा चालवत असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख १.०३ लाख, दोन कार, आठ दुचाकी, जनरेटर, ९ मोबाईल असा २१.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.