नागपूर: दिवाळीत रेल्वेस्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महिलांकडील रोख रक्कम तसेच दागिने असलेल्या पर्स लंपास करणारी चोरट्या महिलांची एक टोळी रेल्वे पोलिसांनी जेरबंद केली. ललिता कैलास लोंढे (वय ४०), आशा जय नाडे (वय ४५), लीला पराण मानकर (वय ४५) आणि मधु अमर आडे (वय २५) अशी या टोळीतील चोरट्या महिलांची नावे असून, त्या सर्व रामटेकेनगर (टोली, रामेश्वरी) भागात राहतात.
मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये चढणाऱ्या एका महिलेची मनीपर्स चोरीला गेली होती. या पर्समध्ये सोन्याचे दागिने होते. त्याची तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी फलाटावरील सीसीटीव्ही तपासले असता घटनेच्या वेळी या महिला फलाटावर संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी फलाटावर लक्ष केंद्रित केले. या महिला पुन्हा दि. ३१ ऑक्टोबरला तशाच प्रकारे संशयास्पद अवस्थेत गर्दीच्या ठिकाणी घुटमळताना आढळल्या. परिणामी रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चाैकशी केली.
या महिलांपैकी एकीकडेही रेल्वेचे तिकीट अथवा पास आढळली नाही. त्यामुळे त्यांनीच हा गुन्हा केल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून ८०० रुपये जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखाच्या (रेल्वे) प्रभारी मनीषा काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिसांनी ही कामगिरी बजावली.
वर्षभर हेच कामज्या भागात या महिला राहतात. त्या भागात अशाप्रकारे चोऱ्या करणाऱ्या महिलांची एक मोठी टोळी असून, त्या तीन, चार अथवा पाच जणींचा समूह बनवून वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करतात. वर्षभर त्या हेच काम करतात.