नागपूर : अनेकदा लहान मुले घराच्या अंगणातील गेटवर खेळत असताना त्यावर चढून झुलताना दिसून येतात. मात्र, ही बाब गंभीर ठरू शकते, याची कल्पनादेखील पालकांना नसते. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेटवर चढून खेळणाऱ्या पाच वर्षीय मुलाला नाहक जीव गमवावा लागला. रियांश तुलसीदार टांगले असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
निवृत्तीनगर, गुजराती कॉलनी येथे राहणारे तुलसीदास टांगले यांचा मुलगा घराच्या लोखंडी गेटवर चढून खेळत होता. तो खेळत असतानाच अचानक त्या गेटचा लोखंडी नट निघाला. यामुळे गेट खाली पडले व त्याच्यासह रियांशदेखील खाली पडला. त्याच्या डोक्यावर व उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ गंभीर दुखापत झाली. त्याच्या किंकाळ्या ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले तेव्हा तो रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्याला तातडीने मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.
यामुळे त्याच्या पालक व कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नेहमी हसतखेळत असलेला रियांश अशा दुर्दैवी पद्धतीने निघून गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कळमना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन्ही बहिणींचा लाडका भाऊ गेला
तुळशीदास टांगले हे पोकलेन चालक आहेत. त्यांना दोन मुली व रियांश अशी एकूण तीन अपत्ये होती. रियांश सर्वात लहान होता. घटना झाली त्यावेळी त्याची आई व बहिणी घराच्या आत होत्या. रियांशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.