नागपूर : अगोदरच पैशांमुळे वाद असलेल्या मित्राने बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या गुंडाने त्याची भरदिवसा हत्या केली. या घटनेमुळे गड्डीगोदाम परिसरात खळबळ उडाली होती. प्रणय पात्रे (वय २३, बारा खोली, इंदोरा) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी काही तासांतच आरोपी सत्येंद्र ऊर्फ लंबू बकरी पुरण यादव (२३, रा. झिंगाबाई टाकळी) याला अटक केली.
प्रणव पात्रे हा भंगार खरेदी व विक्रीचा व्यवसाय करत होता, तर सत्येंद्र हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. प्रणव आणि सत्येंद्र यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून मैत्री आहे. त्यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. सत्येंद्रची बहीण पोलीस कर्मचारी आहे. प्रणयलाही ही गोष्ट माहीत होती. पैशांच्या वादावरून गुरुवारी सकाळी गड्डीगोदाम परिसरातील सेंट मायकेल शाळेजवळ दोघांमध्ये भांडण झाले. प्रणयने सत्येंद्रच्या बहिणीला उद्देशून अश्लील शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली व काही कळण्याच्या आतच सत्येंद्रने प्रणयच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार केले. वेदनेने कळवळत प्रणय खाली पडला. घटनेची माहिती मिळताच सदरचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रणयला दवाखान्यात नेले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीवर परत वार
सत्येंद्रने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रणय जिवंत असल्याचा संशय घेऊन त्याचे पाय धरले व काही अंतरावर ओढत नेले. तेथे त्याच्या पोटावर व छातीवर परत चाकूने वार केले. त्यानंतर त्याच्या पोटात लाथादेखील मारल्या. प्रणयचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर सत्येंद्र तेथून फरार झाला.
रेल्वे लाइनजवळ केली अटक
हत्या केल्यानंतर सत्येंद्र हा कामठी मार्गावरील रेल्वे लाइनच्या दिशेने गेल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्या परिसरात पोलिसांचे पथक गेले असता एक व्यक्ती संशयितपणे उभी असलेला दिसून आली. पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले व नेमका तोच सत्येंद्र होता. ईश्वर जगदाळे, वीरेंद्र भोसले, संदेश पाटील, अजय पौनीकर, चेतन जाधव, सुधीर सोंदरकर, नितीन वासने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी सराईत गुुन्हेगार
सत्येंद्र हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात अगोदरदेखील गुन्हे दाखल आहेत. त्याने हत्येचादेखील प्रयत्न केला होता. घटनेच्या वेळी परिसरात अनेक लोक उपस्थित होते. मात्र, प्रणयला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.