नागपूर : नागनगरीने आज ‘मर्यादा पुरुषोत्तमा’च्या जन्माची द्वाही फिरविली. श्रद्धेच्या सत्संगात नागनगरी न्हाऊन निघाली. ‘जय श्रीराम’चा गजर करीत निघालेली शोभायात्रा म्हणजे अवघ्या नागपूरकरांनी चांगुलपणाला घातलेली सादच होती. यात सलाम होता अन् नमनही! भक्तीची ही साद आणि भाविकांच्या उत्साहाचा प्रतिसाद असे भारलेले अपूर्व वातावरण आज संपूर्ण शहरात होते.
कोरोनामुळे तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून गुरुवारी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात शोभायात्रा निघाली. श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्या निर्मितीचे शताब्दी वर्ष असून ही ५७वी शोभायात्रा होताी. तऱ्हेतऱ्हेच्या चित्ररथांची ही चैतन्ययात्रा पाहण्यासाठी हजारो आबालवृद्ध रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे होते. जणू वनवास संपवून प्रभू राम अयोध्येत प्रत्यक्षातच परतत आहेत, असा हा प्रसंग होता. भगव्या टोप्या घातलेले स्वयंसेवक कंबर कसून शोभायात्रेचा मार्ग मोकळा करीत होते. रामासारखा आदर्श शासक, उत्तम माणूस आजच्या समाजातही प्रगटावा, अशी करुणा मनोमन भाकत होते. शोभायात्रेचे प्रत्येक क्षण साठवण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. एक-एक चित्ररथ पुढून जाताना अनेक जण पायातल्या वहाणा काढून रथातल्या देवाला हात जोडत होते. तर कुणी सोबतच्या लहानग्याला खांद्यावर उचलून ‘राम’ दाखवीत होते. महिला पदर डोक्यावर घेऊन नमस्कार करीत होत्या. तरुण मंडळी चित्ररथाचे फोटो काढण्यात तर कोणी सेल्फी घेण्यात व्यस्त होते.
-स्वागत कमानी, प्रसादाचे वितरण आणि आकंठ बुडालेले भाविक
भगवान रामाच्या श्रद्धेची भाविकांच्या चेहऱ्यावर पसरलेली भावपूर्णता..., गर्दीने फुललेले रस्ते...., चौकाचौकातील ध्वनिक्षेपकामधून रामनामाचा जप... तर कुठे डीजेवर ‘रामजीकी निकली सवारी...’ यांसारखी रामभक्तीच्या गाण्याची धूम..., स्वागत कमानी..., फुलांचा परिमळ..., प्रसादाचे वितरण आणि आकंठ बुडालेल्या भाविकांनी केलेला ‘जय श्रीरामचा’चा गजर’, उत्साहाने आणि आनंदाने भरलेल्या मंगलमयी वातावरणात पोद्दारेश्वर राममंदिरातून श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेला शिस्तबद्ध पद्धतीने प्रारंभा झाला. प्रत्येक चौकात शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केली जात होती.
- राज्यपाल व उपमुख्यमंत्र्यांच्या पूजेने शोभायात्रेला सुरुवात
पोद्दारेश्वर राममंदिरात दुपारी चार वाजता मुख्य दिव्य रथावरील श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती पूजेनंतर पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अनीस अहमद, माजी आ. दिनानाथ पडोळे, माजी आ. मिलिंद माने, माजी महापौर दयाशंकर तिवारी, खादी ग्रामउद्योगचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, माजी नगरसेवक मनोज साबळे, स्वामी समर्पणानंदजी महाराज, सुरेश जग्यासी आदींनी पुष्पांजली वाहिली. त्यानंतर राज्यपालांसह उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांनी व भाविकांनी दोर खेचून रथ ओढला अन् शोभायात्रेला सुरुवात झाली.