हायकोर्टातील वकील तिला म्हणाला, 'स्वर्गातून पाठविण्यात आलेय तुला'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:50 AM2023-08-24T11:50:48+5:302023-08-24T11:58:42+5:30
पीडित मुलीची तक्रार : कडक कारवाई करण्याची मागणी
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका वकिलाविरूद्ध पीडित मुलीने लैंगिक छळाची तक्रार केली आहे. तसेच, संबंधित वकिलावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित वकिलाने मुलीला 'स्वर्गातून पाठविण्यात आलेय तुला' यासारखे मेसेज पाठविले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीमुळे शहरातील विधी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
उच्च न्यायालयाचे प्रशासकीय व्यवस्थापक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा व हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूर यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. संबंधित वकील मार्च-१९९९ पासून हायकोर्ट बार असोसिएशनचे सदस्य आहेत. ते वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असल्यामुळे पीडित मुलगी त्यांच्यासोबत आदरपूर्वक बोलत होती. परंतु, त्या वकिलाने ज्येष्ठ असल्याचे भान विसरून तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवायला सुरुवात केली. त्यांनी ९ मार्च २०१९ रोजी तिला 'एक व्यक्ती... जिला स्वर्गातून पाठविण्यात आले आहे...' असा पहिला व्हॉट्सॲप मेसेज पाठविला. त्यामुळे पीडित मुलीने त्या वकिलासोबत बोलणे व त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर वकिलाने २० फेब्रुवारी २०२१ रोजी 'शक्य असल्यास मला सोडून जाऊ नकोस...' असा एसएमएस पाठविला होता. त्यामुळे पीडित मुलीने टोकले असता त्यांनी चूक झाल्याचे कबूल केले. परंतु, आक्षेपार्ह वागणे बंद केले नाही.
ते पीडित मुलीकडे डोळे फाडून एकटक बघत राहतात. तिला शारीरिक - मानसिक त्रास देण्याची संधी शोधत राहतात. त्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजे, २१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३:२६ वाजता पीडित मुलीला 'फक्त तुझाच...' असा एसएमएस पाठविला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, संबंधित वकील छळ करीत असल्यामुळे मनमोकळेपणाने काम करू शकत नाही, सतत भीती वाटत राहते, असेही पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
शंभरावर महिला वकिलांनी घेरले
पाणी डोक्यावरून जात असल्याचे लक्षात आल्यामुळे बुधवारी शंभरावर महिला वकिलांनी संबंधित वकिलाला टायपिंग कक्षाजवळ घेरले व पीडित मुलीच्या लैंगिक छळासंदर्भात जाब विचारला. दरम्यान, संबंधित वकिलाने 'बॅक फुट'वर जाऊन वेळ मारून नेली. त्यानंतर त्या वकिलाविरूद्ध तक्रार करण्यात आली.
तक्रारीवर योग्य निर्णय घेणार
'लोकमत'ने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. अनिल गोवारदीपे व हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, पीडित मुलीची तक्रार मिळाली, अशी माहिती दिली. तसेच, ॲड. गोवारदीपे यांनी ही तक्रार पुढील कार्यवाहीकरिता कौन्सिलच्या मुख्यालयाकडे पाठविली जाईल, असे सांगितले तर, ॲड. पांडे यांनी तक्रारीवर नियमानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.