नागपूर : नागपुरातील गोकुळपेठ भागातील रहिवासी आणि तुमसरच्या आयटीआयमध्ये शिल्प निदेशक असलेले योगेश नगरकर यांनी शिक्षकदिनी तीन महिन्यांचे वेतन रोखल्यामुळे आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, नगरकर यांच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे.
योगेश नगरकर यांची तीन महिन्यांपूर्वी नागपूरवरून तुमसर येथील आयटीआयमध्ये शिल्प निदेशक पदावर बदली करण्यात आली होती. परंतु तेथील प्राचार्य नीता पिसे यांनी नगरकर यांना इतर विभागांचा पदभार स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. योगेश यांचे वडील आजारी आहेत. योगेश यांची मुलगी बारावीला शिकते व त्यांनासुद्धा मायग्रेनचा त्रास होता. त्यामुळे त्यांनी इतर विभागाचा अतिरिक्त प्रभार स्वीकारण्यास नकार दिला होता. यशिवाय त्यांना ज्या विभागाचा अतिरिक्त प्रभार स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्या जात होता, त्या विभागाचा त्यांना अनुभव नव्हता. तुमसर आयटीआयमधील इतर वरिष्ठ शिल्प निदेशकांनीही अतिरिक्त प्रभार स्वीकारण्यास नकार दिला होता. योगेश यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे प्राचार्य नीता पिसे या त्यांना मोठ्याने बोलत होत्या तसेच त्यांचे तीन महिन्यांचे वेतन रोखून धरले होते. त्यामुळे ते मानसिक तणावात होते.
खोटी तक्रार केल्याचा आरोप...
या तणावातून त्यांनी ५ सप्टेंबरला गोकुळपेठ येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप योगेश नगरकर यांचे भाऊ नीलेश नगरकर यांनी केल्यामुळे खळबळ उडाली होती. याशिवाय प्राचार्य पिसे यांनी सहसंचालक देवतळे यांच्याकडे योगेश नगरकर यांची खोटी तक्रार केल्यामुळे देवतळे यांनी योगेश यांना फटकारल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. परंतु याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सहसंचालक देवतळे यांनी या घटनेशी आपला कोणताच संबंध नसून सहसंचालक कार्यालयाने योगेश नगरकर यांचे वेतन थांबविले नव्हते, असे कळविले आहे. घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली असून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सहसंचालक देवतळे यांनी कळविले आहे.