नागपूर : ज्या गोष्टी इतरांजवळ बोलता येत नाही त्या डायरीत लिहून मनावरील ताण हलके करण्यावर तिचा भर असायचा. व्यथा-वेदना इतरांसमोर मांडता येत नसल्याने ‘पर्सनल डायरी’त ती व्यक्त व्हायची. मात्र प्राध्यापक असलेल्या काका-काकूने तिच्या नकळतपणे ती डायरी वाचून मोबाईलने फोटो काढले. आपल्या खाजगी गोष्टी नातेवाईकांमध्ये पसरवून बदनामी करतील या विचाराने ती तणावात होती व त्यातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धापेवाडा येथे ही घटना घडली असून पोलिसांनी काका रत्नाकर डहाट व काकू मंगला डहाट (रा.सुयोग नगर, नागपूर) यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.
निकीत डहाट असे मृतक तरुणीचे नाव असून तिचा भाऊ पंकज याने यासंबंधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार तिला आई, मोठी बहीण व भाऊ आहेत. ती लहानपणापासूनच आजोबा रामाजी डहाट यांच्यासह धापेवाडा येथे राहत होती .अभ्यासात हुशार असल्याने तिने एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले व तिला नुकतीच एका खाजगी कंपनीत नोकरीलादेखील लागली होती. तिला लहानपणापासूनच रोज डायरी लिहीण्याची सवय होती.
काही महिन्यांअगोदर चुलत बहिणीची शस्त्रक्रिया झाल्याने काका रत्नाकर डहाट यांनी निकीताला मदतीसाठी बोलावून घेतले. १५ ते २० दिवसांत तिला अक्षरश: नोकराप्रमाणे वागणूक मिळाली. त्यानंतर चुलतबहिणीसोबतच पुणे येथे जा यासाठी काका-काकूने तिच्यावर दबाव टाकला. मात्र आजोबांनी त्याला नकार दिला. २४ एप्रिल रोजी काका-काकू धापेवाडा येथे आले असता त्यांनी निकीताची डायरी वाचली व त्याच्या काही पानांचे फोटो काढले. निकीताला हे कळल्यावर ती तणावात आली. तिने डायरीत काकूला उद्देशून ‘डेव्हील ऑफ द फॅमिली’ असे लिहीले होते. यावरून काकूचा तिळपापड झाला होता व तिने तिच्या बहिणीलादेखील याबाबत सांगितले.
काका व काकू माझी बदनामी करतील, अशी तिला भिती वाटत होती. यावरून ती काही दिवसांपासून प्रचंड तणावात होती. निकिताने मला ‘डेव्हील’ कसे काय लिहीले याचा सर्व नातेवाईकांसमोर जाब विचारू अशी काकूने भूमिका घेतल्याने निकीता आणखी दहशतीत आली. यातूनच तिने १४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला काका व काकू जबाबदार असल्याचा आरोप तिच्या भावाने केला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. रत्नाकर डहाट हे एका कला महाविद्यालयाचे प्राचार्य असून मंगला डहाट या वर्धा मार्गावरील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ‘लोकमत’ने रत्नाकर डहाट यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन सातत्याने बंदच होता.
भावाजवळ मांडली होती कैफियत
काका-काकूकडून होणाऱ्या मानसिक छळाबाबत निकिताने भावाजवळ कैफियत मांडली होती. जी डायरी भावानेदेखील वाचली नाही ती त्यांनी कशी वाचली हा तिचा सवाल होता. २ जुलै रोजी तिने भावाला भेटून या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.