नागपूर : तीव्र हृदय विकाराचा झटका आल्याने ५० वर्षीय रुग्णाच्या हृदयाच्या पडद्याला छिद्र पडले. रुग्णाचा जीव धोक्यात आला. छिद्र बंद करण्यासाठी ‘ओपन हार्ट’ सर्जरीचा पर्याय होता. परंतु, मृत्यूचा धोका १५ ते २० टक्के होता. यामुळे मांडीतून ‘कॅथेटर’ सारखी नळी टाकून त्याद्वारे छत्रीसारखी रचना असलेल्या उपकरणाने छिद्र बंद करण्यात आले. रुग्णाला जीवनदान मिळाले.
कामताप्रसाद दिवांगन (५०) त्या रुग्णाचे नाव. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु प्रकृती गंभर होत असल्याचे पाहत त्यांना तातडीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटचले हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निधीश मिश्रा म्हणाले, की रुग्णाची तपासणी केल्यावर ‘व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर’ नावाचा दुर्मिळ आजाराचे निदान झाले. यामध्ये हृदयाच्या डाव्या आणि उजव्या ‘वेंट्रिकल्स’ला विभाजित करणाऱ्या पडद्याला छिद्र पडले होते. तातडीने उपचार न केल्यास ९० टक्के मृत्यूचा धोका होता. यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’चा पर्याय होता. परंतु १५ ते २० टक्के जिवाला धोका होता. यामुळे शस्त्रक्रियेविना उपकरणाने छिद्र बंद करण्याचा दुसरा पर्याय निवळला.
-हृदयाला पडलेले छिद्र मोठे होते
डॉ. मिश्रा म्हणाले, की जन्मत: दोष असलेल्या काही रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या हृदयाला असलेले छिद्राच्या तुलनेत हे छिद्र मोठे होते. यामुळे उपचाराची प्रक्रिया गुंतागुंतीची होती. छत्रीसारखे दिसणारे ‘सेप्टल ऑक्लुड’ यंत्राद्वारे हा दोष बंद करण्याचे आम्ही नियोजन केले. अनुभव व कौशल्याचा मदतीने छिद्र बंद करण्यात यश मिळाले. यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष चौखंद्रे, डॉ. निधीश मिश्रा, वरिष्ठ कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. आनंद संचेती यांच्यासह डॉ. संदीप धूत, डॉ आयुष्मा जेजानी आणि कॅथ लॅब तंत्रज्ञानी सहाकार्य केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, की प्रगत तंत्रज्ञानामुळे अशा गंभीर प्रकरणांना हाताळण्यास मदत झाली.
-तीन दिवसांत रुग्णालयातून सुटी
२३ नोव्हेंबर रोजी रुग्णांवर ही प्रक्रिया पार पडली आणि काही तासांतच रुग्णाला बरे वाटू लागले. २६ नोव्हेंबरला रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मध्य भारतातील ही पहिली यशस्वी प्रक्रिया असल्याचे डॉक्टरांनी दावा केला आहे.