नागपूर : अंतराळात घडणाऱ्या असंख्य घडामाेडींविषयी आपण अनभिज्ञ असलाे तरी त्या मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या असतात. अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अशाच एका संकटाचा इशारा अंतराळ वैज्ञानिकांनी दिला आहे. ६५६ फूट एवढ्या अवाढव्य आकाराचा दगड अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. ताे पृथ्वीवर धडकण्याची शक्यता कमी आहे; पण, तसे झाले तर काय? याकडे वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकन अंतराळ संशाेधन संस्था नासाने याबाबतची माहिती दिली आहे. एखाद्या लघुग्रहाप्रमाणे असलेल्या या दगडाचा आकार ६५६ फूट म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या दुप्पट आहे. जेव्हा ताे पृथ्वीजवळून जाईल, तेव्हा त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ४५ लाख किलाेमीटर असेल. सामान्य माणसांना हे अंतर खूप अधिक वाटत असले तरी अंतराळाच्या दृष्टीने ते अतिशय कमी आहे. विशेष म्हणजे, ताे जवळून जाणार असला तरी अंतराळातील वेळेवर घडणाऱ्या एखाद्या घडामाेडीमुळे त्याची दिशा बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
‘नासा’ने या दगडाला अंतराळातून येणाऱ्या ‘लघुग्रहा’च्या श्रेणीत टाकले आहे. अंतराळातील एखाद्या वस्तूचा पृथ्वीला धाेका निर्माण झाला तर वैज्ञानिक त्याला एस्टाेराॅइडच्या श्रेणीत टाकतात. या वेगाने येणाऱ्या अवाढव्य दगडापासून पृथ्वीवासीयांना सध्यातरी धाेका नाही; पण, अशा दगडाने खराेखर पृथ्वीला धडक दिली तर आपली पृथ्वी या संकटाचा सामना करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे अशा संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा वैज्ञानिकांद्वारे प्रयत्न केला जात आहे.
२०२३ सीएल-३
‘२०२३ सीएल-३’ असे नाव या अंतराळ दगडाला वैज्ञानिकांनी दिले आहे. हा दगड ताशी २५ हजार किलाेमीटरच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असून, येत्या २४ मे राेजी ताे पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.