विजय नागपुरे
कळमेश्वर (नागपूर) : विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र धापेवाडा येथे गुरुवारी वारकऱ्यांसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. पहाटे ५.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक व महापूजा आटोपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असला तरी यात्रेत मात्र भक्तीचा महापूर आला होता.
गुरुवारी पहाटे विठू माऊलीची महापूजा माजी मंत्री आ. सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, कांचन गडकरी, सारंग गडकरी, डाॅ. राजीव पोतदार, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष बाबाराव कोढे, पं. स.सभापती श्रावण भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, सरपंच सुरेश डोंगरे, उपसरपंच राजेश शेटे, देवस्थान कमिटीचे सचिव आदित्यप्रताप सिंह पवार, माजी सरपंच डाॅ. मनोहर काळे उपस्थित होते.
मंदिर परिसरात जवळपास ३०० भजनी मंडळ व दिंड्या पालख्या बाहेर गावावरून आल्या होत्या. ‘ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ- मृदंगाच्या साथीने भजन, कीर्तन म्हणत हजारो विठ्ठल भक्तांनी माऊलीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात आली होती, तर येथे आलेल्या प्रत्येक भाविकांना महाप्रसाद व अल्पोपहाराची व्यवस्था करून देण्यात आली होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत ७०-७५ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले.
नदी पात्रावर प्रशासनाचे लक्ष
देवस्थान परिसरात नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत असताना भाविकांना हानी पोहचू नये याकरिता उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार सचिन यादव, नायब तहसीलदार सुजाता गावंडे, मंडल अधिकारी नीलेश केचे लक्ष ठेवून होते. विश्व मानव रुहानी केंद्राचे ४५० स्वयंसेवक यात्रेच्या नियोजनात सहभागी होते. यात्रेच्या नियोजनासाठी मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह पवार, सचिव आदि त्यप्रताप सिंह पवार, भानुप्रताप सिंह पवार, निखिल गडकरी, विलास वैद्य, अरुण चिखले, प्रभाकर रानडे आदिंनी प्रयत्न केले. खा. कृपाल तुमाने यांनी दुपारी विठू माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
आरोग्य सेवा, पोलीस बंदोबस्त
भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद रेवाळे यांच्या मार्गदर्शनात आरोग्यसेवक व सेविका लक्ष ठेवून होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनात सावनेरचे पोलीस निरीक्षक मारुती मुळक, कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त तैनात होता.