नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उर्समध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील विविध भागातून प्रचंड संख्येत भाविक येत आहेत. परिणामी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. सर्वाधिक भाविक नागपूर - मुंबई मार्गावरील असल्याचे लक्षात आल्याने मध्य रेल्वेने या मार्गावर एका स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली आहे. शनिवारी दुपारी ही नागपूर -कल्याण स्पेशल ट्रेन धावणार आहे.
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या वार्षिक उर्सला नागपुरात सुरूवात झाली आहे. या उर्समध्ये मन्नत मागण्यासाठी आणि मागितलेली मन्नत पूर्ण झाल्यामुळे बाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतात. वार्षिक उर्स सुरू झाल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून बाबांच्या दर्शनासाठी ताजबागमध्ये रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. ती वाढतच चालली असून आज शुक्रवारी प्रचंड संख्येत भाविक आल्याने रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या ट्रेनमध्ये भाविक मोठ्या संख्येत येत असल्याची बाब लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने आज तातडीने एक निर्णय जाहिर केला आहे. ही मंडळी उद्या परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज बांधून शनिवारी, ३ ऑगस्टला दुपारी नागपूर - कल्याण ही स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता नागपूर स्थानकावरून ही विशेष गाडी प्रवाशांना घेऊन निघणार आहे. मार्गातील अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, अमरावती, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि नाशिक नंतर कल्याण येथे ट्रेन थांबणार आहे. नागपूर मुंबई मार्गावरील प्रवाशांनी या गाडीच्या प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जीआरपी, आरपीएफचा चोख बंदोबस्तबाहेरगावून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड संख्या आणि त्यामुळे रेल्वे स्थानकावर झालेली गर्दी पाहता, कुण्या समाजकंटकाने गैरफायदा घेऊ नये म्हणून रेल्वे पोलीस (जीआरपी) तसेच रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) अलर्ट मोडवर आले आहे. रेल्वे स्थानक तसेच आजुबाजुच्या परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शस्त्रधारी तसेच साध्या वेषातील जवान गर्दीत शिरून संशयीतांवर नजर ठेवत आहेत. वेगवेगळी श्वानपथके आणि बॉम्ब शोधक तसेच नाशक पथकही रेल्वेस्थानकाच्या आत-बाहेरच्या परिसरात तैनात आहे. संशयीतांना लगेच ताब्यात घेऊन चाैकशी केली जात आहे.