नागपूर (उमरेड) : तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असतानाच अचानक बिबट्याने झडप मारली. बिबटच्या या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३४० संरक्षित वनात ही घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. कल्पना उत्तम चौधरी (३५, रा. भिवगड, ता. उमरेड) असे मृत महिलेचे नाव आहे. भिवगड गावापासून सुमारे दीड किलोमीटरच्या परिसरात ही घटना घडली.
गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भिवगड येथील महिला संरक्षित वनात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. कल्पना चौधरी हिच्यासमवेत अन्य पाच महिला आणि एक मजूर सोबत होता. येथील पहाडीच्या परिसरात सर्व मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. अशातच झुडपात दडून बसलेल्या बिबटने कल्पना हिच्यावर हल्ला केला.
कल्पना हिच्या गळ्याला पंजा मारत काही फुट अंतरापर्यंत तिला फरफटत नेले. यात तिचा मृत्यू झाला. अगदी काही फुट अंतरावर असलेल्या अन्य महिलांनी हा थरारक प्रसंग बघताच आरडाओरड सुरू केली. गावात या घटनेची माहिती समजताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. वनरक्षक रोहिनी गुरनुले यांनीही घटनास्थळ गाठत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. मृत कल्पना हिला मुलगा आणि मुलगी असून पती उत्तम हे शेतमजुरीची कामे करतात. घटनास्थळी नेत्रवन विज्ञान केंद्र डव्हा अंतर्गत भिवगड परिसरातील तेंदूपत्ता संकलनाचे कार्य ग्रामसभामार्फत सोपविण्यात आले होते. ११ मेपासून हे काम सुरू झाले होते. गुरुवारी सकाळीच या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे. घटनास्थळी सहायक वनसंरक्षक नागपूर मनोज धनविजय, उत्तर वन परिक्षेत्राधिकारी पीडी बाभळे, वनपाल एस. डी. पाटे, दक्षिण उमरेड वन परिक्षेत्राधिकारी कोमल गजरे बुटीबोरी वन परिक्षेत्राधिकारी पी. एम. वाडे, वनपाल एस. डी. चाटे, व्ही.एम. अंबागडे आदी हजर होते. पंचनामा केल्यानंतर उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.