नागपूर : दाभा परिसरातील संपत ले-आउट भागातील काही नागरिक रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जेवनानंतरची शतपावली करून घराच्या दिशेने निघाले हाेते आणि अचानक समाेर चक्क बिबट्याचे दर्शन घडले. भीतीने थरकाप उडालेल्या पुरुष-महिलांच्या ग्रुपने थेट घराकडे पळ काढला. मात्र बिबट्याचा वावर आढळल्याने मुलाबाळांच्या चिंतेमुळे लाेकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गाेरेवाडा जंगल परिसराच्या जवळपास असलेल्या वस्त्यांमध्ये अधून-मधून बिबट्याचे दर्शन घडत असते. तिच घटना रविवारी रात्रीही घडली. दाभ्यातील सेंटर पाॅइंट शाळेच्या मागे संपत ले-आउटच्या परिसरात रविवारी रात्री १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान बिबट्या दिसून आला. येथील रहिवासी महिला यावेळी शतपावली करून घरी परतत हाेत्या. यातील ममता वाघ यांनी सांगितले, बिबट्या असल्याचे समजताच आम्ही घराकडे पळालाे. यासाेबत वस्त्यांमधील इतरही नागरिकांना बिबट्या वस्तीत असल्याची सुचना करीत घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला. त्यानंतर कुणीही घराबाहेर पडले नाही.
साेमवारी सकाळी काही लाेकांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये तपासले तेव्हा हा बिबट्याने रात्री १२ वाजतापर्यंत वेलकम साेसायटी, वूडलॅंड साेसायटी या भागात तीन ते चार चकरा मारल्याचे आढळून आले. या भागात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने गाेरेवाडा जंगलाची सुरक्षा भिंत ओलांडून बिबटे वस्तीत येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत स्थानिक लाेकप्रतिनिधींच्या मदतीने वनविभागाकडे तक्रार केल्याचेही ममता वाघ यांनी सांगितले. सुरक्षा भिंतीची उंची लहान असल्याने बिबट्यासारखे वन्यप्राणी सहज भिंत ओलांडून वस्तीत येतात. अनेकदा लहान मुले वस्तीमध्ये रात्री खेळत असतात. त्यामुळे नागरिकांची धास्ती वाढली आहे. त्यामुळे वन विभागाने उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली.
याबाबत मिळालेल्या सुचनेनुसार अंबाझरीचे डिएफओ घटनास्थळी पाेहचले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण सहकार्य विभागातर्फे करण्यात येईल. सुरक्षा भिंतीची उंची वाढविण्यासाठी व फेन्सिंग लावण्यासाठी इस्टीमेट तयार करण्यात आले असून यावर्षी ते काम निश्चित पूर्ण हाेईल.- शतनिक भागवत, वन अधिकारी, गाेरेवाडा