नागपूर : २०३१ पर्यंत ‘सायबर क्राइम’मुळे जगभरातील आर्थिक नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता असून, केवळ ‘रॅन्समवेअर’मुळे दहा पटींहून अधिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचा अंदाज अमेरिकेतील सायबर संशोधन संस्थेने वर्तविला आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांकडून ‘रॅन्समवेअर’पासून सुरक्षा करण्यावर विशेष भर देण्यात येत असून सर्वसामान्य लोकदेखील कुठल्याही तज्ज्ञाच्या मदतीशिवाय ‘रॅन्समवेअर’च्या हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकतात.
आजवर झालेल्या रॅन्समवेअर'च्या हल्ल्याचा सर्वसामान्य युझर्सवर अल्प परिणाम झाला आहे. ऑनलाइन व्यवहार, ऑनलाइन खरेदी, एटीएममधून पैसे काढणे, यामध्ये फारसा धोका झालेला नाही. परंतु सेवा आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्या व संस्थांवर अशा हल्ल्यांचा मोठा परिणाम होतो. ‘डेटा’शी संबंधित संस्था व व्यक्तींना या माध्यमातून ‘टार्गेट’ करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत प्रत्येकाने थोडी काळजी व थोडी सतर्कता बाळगली तर त्यापासून सहज सुरक्षित राहू शकतो, असे प्रतिपादन ‘सोशल मीडिया’तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले.
ई-खंडणीचाच प्रकार
‘रॅन्समवेअर’मध्ये सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुम्हाला खंडणीची मागणी करतो. संगणक हॅकिंग कुठल्याही माध्यमातून होऊ शकते. जर ठराविक मुदतीत रक्कम दिली नाही तर संगणक यंत्रणेतील सर्व डेटा ‘डिलिट’ करण्यात येईल, अशी धमकीच दिली जाते. अशी कामे करण्यासाठी ‘डार्क वेब’वर उपलब्ध असलेल्या विविध ‘रॅन्समवेअर सॉफ्टवेअर्स’चा देखील उपयोग करण्यात येतो. असा ‘रॅन्समवेअर’ किंवा ‘मालवेअर’ संगणकीय प्रणालीत शिरल्यावर चालू असलेल्या प्रोसेसेस बंद करणे, रिकव्हरीला अडथळा आणणे, फाईल्स लॉक करणे इत्यादी बाबी घडवून आणतो. त्यानंतर बरेचदा डेस्कटॉपवर खंडणीचा संदेश देणारा वॉलपेपर झळकू लागतो.
अशी करा सुरक्षा
- अधिकृत व चांगल्या दर्जाच्या ॲन्टीव्हायरसचा उपयोग करा.
- नेहमी सुरक्षित व योग्य संकेतस्थळालाच भेट द्या.
- नियमित ‘डेटा’चा बॅकअप ठेवा आणि ते विविध रिमोट सर्व्हरवर संग्रहित करा.
- ईमेलची अटॅचमेंट डाऊनलोड करण्याअगोदर एकदा ई-मेलचा ॲड्रेस तपासा. संशयास्पद ॲड्रेस किंवा ओळखीतील डोमेन नेम नसेल तर फाईल उघडूच नये.
- केवळ अधिकृत ॲपच डाऊनलोड करावे.
- अनेकदा फ्री प्लॅटफॉर्मवरून वेबसिरीज डाऊनलोड करताना अनोळखी लिंक्सला ‘क्लिक’ करणे टाळा.
-युझर्सनी नवीन पॅचेससह सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करावी
- सर्व ई-मेल्स स्कॅन करावे.
- संगणकीय यंत्रणा अद्ययावत ठेवावी.