नागपूर : अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर भाजप गोटात सामील झालेले काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पावर आक्षेप घेत सभागृहात अर्वाच्च भाषेचा वापर केला. ते समाजकल्याण सभापती मिलिंद सुटे त्यांच्याशी भिडले. यावरून वाद वाढला. या वादात कंभाले यांनी फाईल व माईक फेकून सभात्याग केला. त्यांच्या भूमिकेचे समर्थन करीत भाजप सदस्यांनीही सभात्याग करून कामकाजावर बहिष्कार टाकला.
बांधकाम विभागाला जादाचा निधी देण्यात आला आहे. तो कमी करून सदस्यांचा निधी वाढविण्यात यावा, समाजकल्याण व महिला बाल कल्याण विभागाने गेल्या दोन वर्षांचा निधी खर्च केला नाही, असा आक्षेप कंभाले यांनी घेतला. यावर बांधकाम विभागासाठी करण्यात आलेली तरतूद योग्यच आहे. विभागाने ११ कोटींची मागणी केली होती, असे उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी निदर्शनास आणले. देखभाल व दुरुस्तीसाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामांसाठी दोन कोटींचीच तरतूद असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. मात्र, कंभाले यांचे समाधान झाले नाही. विरोधी पक्षनेते आतिष उमरे व संजय झाडे यांनी कंभाले यांच्या भूमिकेचे समर्थन केले. काँग्रेसचे प्रकाश खापरे यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन करीत शासनाने मुद्रांक शुल्काच्या १०२ कोटींपैकी फक्त २७ कोटींचा निधी दिला आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. दुसरीकडे ७०० कोटींच्या विकास कामांना स्थगिती दिल्याचे निदर्शनास आणले. सत्तापक्षाच्या सदस्यांनी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावर कंभाले व उमरे यांनी आक्षेप घेतला. वाद वाढल्याने मिलिंद सुटे यांनी कंभाले यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंभाले संतप्त झाले. अर्वाच्च भाषा वापरून फाईल व माईक फेकून ते सभागृहाबाहेर पडले.
कंभाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर
नाना कंभाले यांनी सभागृहात अर्वाच्च भाषा वापरल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव रश्मी धुर्वे यांनी मांडला. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत हा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी सभागृहात विरोधी पक्षाचे सदस्य नव्हते. सुटे यांनी बॉटल फेकल्याचा विरोधकांनी आरोप करून त्यांच्याही निलंबनाची मागणी करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र, सुटे यांनी बॉटल फेकून मारल्याचे सभागृहाच्या चित्रीकरणात कुठेही दिसून आले नाही.
कंभालेंमुळे भाजपला बळ
जिल्हा परिषदेत आक्रमक नेतृत्व नसल्याने भाजप बॅकफूटवर गेली होती. मात्र, काँग्रेसचे बंडखोर सदस्य नाना कंभाले भाजप गोटात सहभागी झाल्यापासून भाजपला बळ मिळाले आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी सभागृहात आला. कंभाले सभागृहात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पाडत आहेत. यामुळे भाजपला बळ मिळाले आहे. हे बळ आणखी किती दिवस मिळणार, हे तर येणारा काळच सांगू शकेल.