नागपूर : बाहेरगावी जात असल्यामुळे घराच्या रखवालीसाठी वऱ्हांड्यात माणूस ठेवण्यात आला. मात्र तरीदेखील चोरट्यांनी घर फोडून सुमारे २.९६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
निलेश शंकरराव वैरागडे (५७, वेस्ट हायकोर्ट रोज, बजाजनगर) हे १३ ऑक्टोबर रोजी रायगडला गेले. जाताना त्यांनी रात्रीच्या वेळी घराची देखरेख करण्यासाठी त्यांचे परिचित शंकर झोडापे यांना चाबी दिली. त्यांनी झोडापे यांना घराच्या वऱ्हांड्यात झोपण्यास सांगितले होते. त्यानुसार ते नियमित झोपण्यासाठी येत होते. रविवारी रात्रीच्या सुमारास झोडापे तेथे पोहोचले असता एक ३० ते ४० वयोगटातील व्यक्ती घरातून बाहेर पळताना दिसला. झोडापे यांनी पाहणी केली असता वैरागडे यांच्या घराच्या मागील दाराचे कुलूप तुटलेले होते. झोडापेनी वैरागडे यांना फोन करून माहिती दिली. वैरागडे तातडीने नागपुरला परतले व घरात चाचपणी केली असता लोखंडी कपाटातील २.९६ लाखांचे दागिने गायब होते. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.