नागपूर : मोतीबागमधील नॅरोगेज रेल्वे म्युझिअममध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत म्युझिअममधील अनेक ऐतिहासिक साहित्य आणि महत्वपूर्ण दस्तावेज जळून खाक झाले. आगीत ७५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. आग कशाने लागली ते स्पष्ट झाले नसले तरी या आगीमुळे रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी उशिरारात्री रेल्वे म्युझिअमला आग लागली. या आगीत म्हुझिअममधील अनेक पुरातन चिजवस्तू, मिनी रेल्वे मॉडल, हेरिटेज डाक्युमेंट, हरिटेज पोस्टाचे स्टाम्प, सीसीटीव्ही, डीव्हीआर, कॉम्प्युटर, फर्निचर तसेच बाजुचे सभागृह, त्यातील स्क्रीन आणि प्रोजेक्टर, खुर्च्या, व्यवस्थापक कार्यालय, बाजुच्या चार रूम आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले.
आग लागल्याचे लक्षात संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या दोन गाड्या तेथे पोहचल्या. पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाने यश मिळवले. तोपर्यंत बरेचसे म्युझिअम जळून खाक झाले होते. आग कशाने लागली हे स्पष्टपणे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले नाही. मात्र ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे.
अधिकाऱ्यांचे मौन संशयास्पदहे म्युझिअम रेल्वेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. त्यात अशा प्रकारे आग लागून बहुतांश माैल्यवान चिजवस्तूंची राखरांगोळी होणे संशयास्पद आहे. त्यातही विशेष म्हणजे, या आगीसंबंधाने रेल्वे अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करूनही रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करणे, संशयास्पद ठरले आहे.