आवडतीच्या नकारामुळे पिसाळून रक्तपात करणारा मेकॅनिक दोषीच; शिक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 08:45 PM2023-06-29T20:45:22+5:302023-06-29T20:47:52+5:30
Nagpur News आवडत्या मुलीने जवळीक वाढविण्यास नकार दिल्यामुळे पिसाळून रानटी पशूप्रमाणे रक्तपात करणारा दुचाकी मेकॅनिक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दोषीच ठरला. त्यामुळे त्याची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवण्यात आली.
नागपूर : आवडत्या मुलीने जवळीक वाढविण्यास नकार दिल्यामुळे पिसाळून रानटी पशूप्रमाणे रक्तपात करणारा दुचाकी मेकॅनिक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दोषीच ठरला. त्यामुळे त्याची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवण्यात आली. न्यायमूर्तिद्वय रोहित देव व ऊर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना हुडकेश्वर पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.
अनवर खान सामीउद्दीन खान (४०) असे आरोपीचे नाव असून घटनेच्या वेळी तो मानेवाडा रोडवरील श्रीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याचे त्याच परिसरात दुचाकी दुरुस्तीचे दुकान होते. त्याची वस्तीमधील मुलगी प्रिया (काल्पनिक नाव) हिच्यावर नजर होती. प्रिया आई-वडिलासोबत राहत होती. तिचे दोन भाऊ बाहेरगावी राहत होते. आरोपी दुचाकी दुरुस्त करण्यासाठी प्रियाच्या घरी जात होता. त्यामुळे प्रिया त्याला ओळखत होती. आरोपीला तिच्यासोबत जवळीक वाढवायची होती. त्यासाठी तो धडपड करीत होता. प्रिया महाविद्यालयात जात असताना आरोपी तिला अडवत होता. एक दिवस त्याने प्रियाला ठार मारण्याची धमकीही दिली. परिणामी, प्रियाने १९ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. त्यामुळे आरोपी आणखीनच पिसाळला.
त्याने २ एप्रिल २०१३ रोजी मध्यरात्रीनंतर देशी कट्टा व धारदार चाकू घेऊन प्रियाच्या घराचे दार तोडले व आत प्रवेश केला. प्रियाचे वडील जाब विचारण्यासाठी पुढे गेले असता आरोपीने त्यांच्यावर देशी कट्ट्याच्या गोळ्या झाडल्या. तसेच, त्यांना चाकूनेही भोसकले. प्रियाची आई मदतीसाठी धावली होती. आरोपीने तिलाही चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. त्यानंतर प्रियाला केस धरून ओढत-ओढत घराच्या छतावर नेले व तिचे डोके जोरात भिंतीवर आपटले. दरम्यान, परिसरातील नागरिक आरडाओरड ऐकून जमा झाले होते. त्यापैकी एकाने चलाखीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीच्या प्राणघातक हल्ल्यामुळे प्रियाचे वडील जागेवरच ठार झाले, तर प्रिया व आई थोडक्यात बचावल्या.
अशी आहे पूर्ण शिक्षा
१४ सप्टेंबर २०१७ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून लावले. आरोपीची शिक्षा पुढीलप्रमाणे आहे.
भादंवि कलम ३०२ (खून) - जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास.
कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) - दहा वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास.
कलम ४४९ व ४५२ (गुन्हा करण्यासाठी घरात शिरणे) - प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास.
हत्यार कायदा कलम ३/२५ - दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.