नागपूर : १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पैशांचे आमीष दाखवून तिच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेस लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी २९ सप्टेंबरला दुपारी २.३६ ते ४.२५ दरम्यान गजाआड करून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
भुरी सोनु उचिया (वय ४०, रा. बदनापूर छावणी ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) ह. मु. सिमेंट रोड, बालाजी मंदिराजवळ लकडगंज असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलिसांना गंगा जमुना वस्तीत कश्मीरीबाई उचिया बागडे गल्लीत अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपी महिला आपल्या आर्थिक फायद्यासाठी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशांचे आमीष दाखवून तिच्याकडून देहव्यापार करून घेताना आढळली.
आरोपी महिला मुलीसाठी ग्राहक व जागा उपलब्ध करून देऊन महिला देहव्यापार करवून घेत असल्याचे दिसले. आरोपी महिलेच्या ताब्यातून एका १६ वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली. आरोपी महिलेविरुद्ध कलम ३७०, ३७० (अ), सहकलम ३, ४, ५, ७, पिटा ॲक्ट सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. पुढील तपास लकडगंज पोलिस करीत आहेत.