नागपूर : आई मोलमजुरी करीत असल्यामुळे नवव्या वर्गात शिकणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिवसभर मोबाईलवर व्यस्त राहत होती. अशातच आईच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चॅटींग करताना तिचे एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत प्रेम झाले. दोघेही सुरतला गेले. परंतु गुन्हे शाखेच्या अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने त्यांना शोधून काढले.
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३३ वर्षीय महिला मजुरी करते. तिला १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी गौरी (बदललेले नाव) आहे. गौरी नवव्या वर्गात शिकते. आई दिवसभर कामासाठी बाहेर राहत असल्यामुळे आईचा मोबाईल गौरीजवळ असायचा. ती दिवसभर मोबाईलवर व्यस्त राहत होती. मागील तिन महिन्यांपासून आईच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गौरी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील नविन शेडगाव येथील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत दररोज चॅटींग करु लागली. यातून त्यांचे प्रेमसंबंध फुलले. अल्पवयीन मुलगा एका दुकानात काम करतो. गौरीच्या आईला या बाबत माहिती पडल्यामुळे तिने गौरीला रागावले. त्यामुळे गौरीने अल्पवयीन मुलाला नागपूरला बोलावले. दोघांनीही पळून जाण्याचा बेत आखला.
गौरीने सोमवार २० मे २०२४ रोजीदुपारी ३.४५ वाजता आपल्या मोठ्या बहिणीला आईसक्रीम आणायला जातो, असे सांगून ती घराबाहेर पडली. त्यानंतर ती अल्पवयीन मुलासोबत सुरतला गेली. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे गौरीच्या आईने सक्करदरा ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. दोन दिवस सुरतला फिरल्यानंतर दोघेही समुद्रपूरमधील नविन शेडगावला परतले. पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने अल्पवयीन गौरीचा शोध सुरु केला. मिळालेली माहिती व तांत्रीक तपास केला असता गौरी नविन शेडगावला असल्याचे समजले. पोलिस निरीक्षक ललिता तोडासे, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र ठाकूर, राजेंद्र अटकाडे, दिपक बिंदाने, सुनिल वाकडे, श्याम अंगुठलेवार, विलास चिंचुलकर, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे, नरेश सिंगणे, वेशाली किनेकर, अश्विनी खोडपेवार यांनी गौरी व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केले. अल्पवयीन मुलाकडे जाण्याची ही गौरीची दुसरी वेळ असल्यामुळे सध्या तिला काटोल नाक्याजवळील बालगृहात ठेवण्यात आले आहे.