नागपूर: घरगुती वादातून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. पाच महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झालेला असताना तीने गळफास घेतल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शुभांगी विक्की तायवाडे (वय २२, रा. आदर्शनगर) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. शुभांगी आणि विक्कीचा पाच महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. विक्की एमआयडीसीच्या एका बिस्कीट कंपनीत काम करीत होता. विक्कीच्या कुटुंबात आईवडिल, लहान बहिण आणि पत्नी शुभांगी होते. परंतु वेगळे राहण्यावरून सुरुवातीपासूनच शुभांगी आणि विक्कीचे खटके उडायचे. विक्कीचे आईवडिल केअर टेकर म्हणून काम करतात.
रविवारी २८ मे रोजी दुपारी १२.१५ वाजता शुभांगीचा सासुसोबत वाद झाला होता. त्यानंतर सासु कामासाठी बाहेर निघून गेली. शुभांगी आणि विक्कीचे सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भांडण झाले. तेवढ्यात विक्कीच्या आईचा फोन आल्यामुळे विक्की आईला आणायला बाहेर गेला. घरी शुभांगी आणि विक्कीची १३ वर्षांची बहिण होती. शुभांगीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करून पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. विक्की आल्यानंतर त्याने खोलीचे दार ठोकले असता त्याला शुभांगीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विक्की घराच्या गल्लीतून गेला असता त्याला शुभांगी पंख्याला लटकलेली दिसली. त्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारी गोळा झाले. त्यांनी शुभांगीला खाली उतरविले.
या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून वाडीचे उपनिरीक्षक विनोद गोडबोले यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.