आशिष दुबे
नागपूर : देशातील सुरक्षा एजन्सी रॉ आणि मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय)ने पुण्यातील कपिला मॅट्रिक्स बिल्डींग, ड्रंकन पांडा रेस्टॉरंट, एबीसी रोड मुंडवात धाड टाकून एका विदेशी नागरिकाला अटक केली आहे. कारवाई दरम्यान पकडलेला विदेशी नागरिक पासपोर्ट व व्हिसा नसताना २०१८ पासून येथे राहत असल्याचा खुलासा झाला.
चार वर्षांपासून हा नागरिक नागपूरसह देशात व राज्यातील विविध शहरात राहिला आहे. त्याला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. सुरक्षा एजन्सीकडून याबाबत कोणतीच माहिती देण्यात येत नाही. पकडल्या गेलेला विदेशी नागरिक ओगुनरमी अबायोमी बाबातुंडे आहे. तो नायजेरियाचा रहिवासी आहे. तो पुण्याच्या डिस्ट्रिक्ट सोसायटी, येवलेवाडीत राहत होता. धाड टाकल्यानंतर त्याच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट आणि व्हिसा आढळला नाही. सूत्रांनी सांगितले की, ओगुरमी ड्रग्स पॅडलर आहे. सोबतच कबुतरबाजीत सहभागी आहे. याशिवाय विदेशातून येथे महिला आणण्याच्या कामात त्याची हात आहे. धाड टाकल्यानंतर त्याच्याकडे मादक पदार्थ आढळले नाहीत. रॉ व मिलिटरी इंटेलिजन्स त्याची चौकशी करीत आहेत.
या कारवाईत मुंढवा पोलीस स्टेशनचे जवान डीबी स्टाफ व एटीसी पथकाला सामील करण्यात आले होते. सूत्रांनी सांगितले की, आरोपी राज्यात अनेक ठिकाणी गेला आहे. तपास एजन्सी त्याची कठोरतेने चौकशी करीत आहेत. त्याच्यासोबत भारतात किती लोक अवैधरित्या राहत आहेत याचाही शोध घेण्यात येत आहे. तो कोणत्या व्यवसायात आहे, त्याचे कोणाशी संबंध आहेत याचीही चौकशी करण्यात येत आहे. सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनुसार तो अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील नागपूरसह इतर शहरात राहत होता. तो १५ दिवसांपूर्वी पुण्यात असल्याची सूचना मिळाली होती. एजन्सीनी संयुक्तरित्या कारवाई करून त्याला अटक केली.
पोलिसांना कशी माहिती मिळाली नाही
-नायजेरियन नागरिकाला अटक केल्यानंतर पोलीस व राज्यातील गुप्तचर संस्थांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैधरित्या तो राहत असताना याची माहिती मुंबई, पुणे, नागपूर पोलिसांना कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे
.......