नागपूर- राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरु आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून पहिल्या दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. याचदरम्यान आज महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे.
सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी काही सदस्यांनी बोलू देण्याची विनंती केल्यानंतरही अध्यक्षांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळं आमदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती. त्यामुळं राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मविआकडून अविश्वास प्रस्तावाचं पत्र देण्यात आलं आहे.
दिशा सालीयन प्रकरणात तर भाजप - शिंदे गटाच्या अकरा सदस्यांना बोलू देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांनी महाविकास आघाडीचे अजित पवार वगळता कुणालाही बोलू दिले नाही. त्यामुळे विधानसभेत गोंधळ घालत विरोधकांनी अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोपी केला. त्यावेळी झालेल्या गोंधळात अध्यक्षांना अपशब्द वापरणाऱ्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे निलंबनही करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी अधिवेशन संपण्याच्या पूर्वसंधेला विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"