नागपूर : काळजाचा तुकडा असलेल्या लेकीला डासांपासून वाचविण्यासाठी पालकांनी पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, डास पळविण्यासाठी लावलेल्या मशीनमधील ‘लिक्विड’ची बाटलीच तिला त्यांच्यापासून हिरावून नेईल, याचा स्वप्नातदेखील विचार आला नाही. त्याच बाटलीला तोंडात टाकल्याने हसतीखेळती त्यांची दीड वर्षाची चिमुकली त्यांच्यापासून कायमची दुरावली गेली. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वादनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रिद्धी दिनेश चौधरी (दीड वर्षे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिला डासांपासून त्रास व्हायला नको यासाठी घरात डास पळविणारी मशीन लावण्यात आली होती. खेळता खेळता रिद्धीने मशीनच्या लिक्विडची बाटली हाती घेतली. कुणाचे तिच्याकडे लक्ष नव्हते व तिने दुपारी साडेबाराच्या सुमारास ती बाटली तोंडात टाकली. त्यानंतर तिची प्रकृती खराब झाली. तिला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचारदेखील सुरू केले. मात्र, दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे तिच्या पालकांना व कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अगदी समोर खेळणारी चिमुकली काही तासांतच अशा दुर्दैवी पद्धतीने हिरावला गेल्यावर विश्वासच होत नसून पालकांचा आक्रोश सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मुलांवर लक्ष ठेवा
आजकाल अनेक घरांमध्ये विविध कंपन्यांच्या डास पळविणाऱ्या मशिन्स दिसून येतात. काही घरांमध्ये २४ तास संबंधित मशीन सुरू असते. यामुळे काही मुलांना इतरही त्रास होतात. शिवाय त्या मशीनचे ‘लिक्विड’ हे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे लहान मुलांच्या हातापासून ते दूर ठेवणे आवश्यक आहे.