नागपूर : दिल्लीहून आंध्रप्रदेशमध्ये दारूची तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सोमवारी रेल्वे सुरक्षा दलाने एकाला अटक करून त्याच्याकडून वेगवेगळ्या ब्राॅंडच्या ३७ दारूच्या बाटल्या जप्त केल्या. पेप्सी वेंकटा कृष्णा रेड्डी (वय ४०) असे दारू तस्करी करणाऱ्याचे नाव असून सध्या तो अटकेत आहे.
ट्रेन नंबर १६०३२ अंदमान एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी होत असल्याचे सांगितले गेल्यामुळे येथील आरपीएफचे ठाणेदार आर. एल. मिना यांच्या नेतृत्वात पीएसआय मडावी, एएसआय अहिरवार, हवलदार देवेंद्र पाटील, आरक्षक नीरज कुमार, मुनेश गाैतम आणि जितेंद्र मोरया आदींनी अंदमान एक्स्प्रेसच्या एस - ४ मध्ये तपासणी केली असता पेप्सी वेंकटा कृष्णा रेड्डीचे वर्तन त्यांना संशयास्पद वाटले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळच्या बॅगची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या दारूच्या ३७ बाटल्या आढळल्या. रेड्डी हा आदित्यनगर नेल्लोर (आंध्रप्रदेश) मधील रहिवासी असून, ही दारू त्याने दिल्लीतून घेतल्याचे सांगितले.
तो ज्याच्यासाठी काम करतो, त्या ठेकेदाराचे नावही त्याने आरपीएफच्या जवानांना सांगितले. या दारूच्या खरेदी संबंधात किंवा वाहतुकीसंदर्भात रेड्डी जवळ कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आरपीएफने राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन बोलवून घेतले. उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेड्डी जवळची ६६,५०० रुपये किमतीची दारू जप्त करून त्याला कारवाईसाठी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.