नागपूर : भावना, कर्म व इच्छा या तीन बाबींवर विजय मिळविणारी व्यक्ती म्हणजे योगी होय, असे मत आध्यात्मिक प्रबोधनकार व कथावाचक जया किशोरी यांनी रविवारी योगिराज कृष्ण विषयावरील व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.
शंकर मुरारका व दिलीप अग्रवाल यांच्यावतीने रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. योगी स्वत:मध्ये अंतरबाह्य बदल करतो. त्याला प्रत्येक विषयाचे ज्ञान असते. तो भावना, कर्म व इच्छांच्या जाळ्यात अडकत नाही. योगी होण्यासाठी वनात जाण्याची किंवा कडक तपश्चर्या करण्याची गरज नाही. समाजात राहूनही योगी होता येते. योगी होण्यासाठी स्वत:च्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करणे व नेहमी चांगले कर्म करणे आवश्यक आहे. भगवान कृष्ण सर्वात मोठे योगी होते. त्यामुळे त्यांनी जीवनातील प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणे पूर्ण केली. त्यांनी प्रत्येक रुपात यश मिळविले, असेही जया किशोरी यांनी सांगितले.