नागपूर : व्यसनपूर्ती आणि माैजमजा करण्यासाठी धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे हातोहात मोबाईल लंपास करणाऱ्या छत्तीसगडमधील एका सराईत चोरट्याला रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे १० महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
साहिल प्रकाश गाैर (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा गोंदिया येथील रहिवासी असून सध्या तारपुरी परिजात कॉलनी दुर्ग (छत्तीसगड) येथे राहतो. आरोपी साहिलला वेगवेगळे व्यसन असून तो अय्याश वृत्तीचा आहे. नशा भागविण्यासाठी आणि माैजमस्ती करण्यासाठी तो रेल्वेतील प्रवाशांचे मोबाईल लंपास करतो. धावत्या रेल्वेत असलेल्या चार्जिंग पॉईंटवर प्रवासी मोबाईल चार्जिंगसाठी लावतात आणि झोपून जातात. ही संधी साधून आरोपी साहिल तो मोबाईल लंपास करतो. त्याने अशा प्रकारे शिवनाथ एक्सप्रेसमधून गुरुवारी, ६ जुलैला १ लाख, ३१ हजार रुपये किंमतीचा आयफोन लंपास केला होता. अशाच प्रकारे त्याने नागपूर, भंडारा, गोंदियातूनही अनेकदा प्रवाशांचे मोबाईल लंपास केेले आहे. लोहमार्ग पोलीसच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी चोर-गुन्हेगारांचा शोध घेत असताना आरोपी साहिल संशयास्पद अवस्थेत त्यांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळच्या पिशवीची पाहणी केली असता त्यात १० महागडे मोबाईल आढळले. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने ठिकठिकाणच्या मोबाईल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ६० हजारांचे मोबाईल जप्त केले.
चोरीचे मोबाईल छत्तीसगडमध्ये विकायचाआरोपी साहिल हा धावत्या ट्रेनमध्ये ठिकठिकाणी मोबाईल चोरायचा आणि नंतर ते एकत्रितपणे दुर्ग तसेच गोंदियात नेऊन विकायचा, असे प्राथमिक चाैकशीत उघड झाले आहे. रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.