नागपूर : हातात पाण्याची बाटली घेऊन धावत्या गाडीत चढण्याचा त्याने प्रयत्न केला. हे करताना स्वत:च्या जिवाशी तो खेळतो आहे, याचे त्याला भानच उरले नाही. मात्र, त्याचे नशिब बलवत्तर होते. त्यामुळे काळाचा डाव परतवला गेला अन् त्याचा जिव वाचला. धडधड करीत रेल्वेगाडी पुढे निघून गेली अन् देवदुतांना बिलगुन मध्य प्रदेशातील एक व्यापारी बराच वेळपर्यंत फलाटावर सून्न पडून राहिला. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ही घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर शुक्रवारी घडली.
कटंगी, बालाघाट (मध्य प्रदेश) येथील व्यापारी प्रकाश शिवल बुधे (वय ३९) शुक्रवारी व्यावसायिक कारणामुळे गोंदियात आले होते. काम आटोपल्यानंतर रात्री ते ट्रेन नंबर ०७८०७ गोंदिया-कटंगी पॅसेंजरने कटंगीकडे परत जात होते. गाडी फलाट क्रमांक १ वर उभी असताना ते फुड स्टॉलवर बराच वेळ उभे राहिले. गाडी सुटल्यानंतर हातात पाण्याची बाटली घेऊन धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागले. गाडीच्या दाराच्या हॅण्डलवरून त्यांचा ओला हात घसरला अन् गाडी तसेच फलाटाच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये बुधे येतात की काय अशी स्थिती निर्माण झाली. बुधे यांना काळ जवळ असल्याची चाहुल लागली आणि त्यांनी तशाच स्थितीत एका हाताने गाडीचा हॅण्डल धरून फलाटावर पायाच्या साह्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू केला. संभाव्य धोक्याची कल्पना येताच अनेकांनी डोळे मिटून घेतले. नेमके त्याचवेळी बुधे यांच्या मागे देवदुत बणून आलेल्या एका दुसऱ्या प्रवाशाने आणि समोर सुरक्षेसाठी उभे असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक एम. के. सक्सेना यांनी बुधे यांना घट्ट पकडून फलाटावर ओढून घेतले. काळाचा डाव परतवण्यात या दोघांना यश आले.
तिकडे धडधड करीत गाडी पुढे निघून गेली अन् ईकडे देवदुतांना घट्ट पकडून श्वास रोखत बराच वेळपर्यंत बुधे फलाटावर पडून राहिले. आजुबाजुच्या प्रवाशांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. प्रकाश बुधे यांचे बंधू मनोज बुधेही धावले. देवदूत बणून प्राण वाचविणाऱ्यांचे त्यांनी भरल्या डोळ्यांनी आभार मानले.
सात सेकंदाचा घटनाक्रम, सोशल मिडियावर व्हायरलप्रकाश बुधे गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना खाली घसरल्याचा आणि त्यांना मृत्यूच्या जबड्यातून ओढून घेण्याचा हा घटनाक्रम केवळ सात क्षणांचा (रात्री ८:५४ ते ९:०१ वाजताचा) होता. देवदुतांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे बुधेंचा जीव वाचला. शनिवारी या घटनाक्रमाचा व्हीडीओ रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला. आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी प्रधान आरक्षक एम. के. सक्सेना यांचे प्रवाशाचा जीव वाचविल्याबद्दल काैतुक करून त्यांचा गाैरव केला.