नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे इंधनाचे दर सातत्याने वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल पंपवाल्यांनीही आपले नवीनच नियम सुरू केल्याचे दिसत आहे. नागपुरातील एका पेट्रोल पंपाने ५० रुपयांच्या खाली पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे.
नागपुरातील पंचशील चौकात असलेल्या पेट्रोल पंपवर '५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही' अशा आशयाचा कागद चिकटवण्यात आला आहे. नागपुरात आज पेट्रोलचे दर १२० रुपये प्रति लिटर आहेत. प्रत्येकाला या किमतीनुसार पेट्रोल भरणे शक्य नाही, त्यामुळे कोणी अर्धा लिटर तर कोणी त्याहुन कमी पेट्रोल भरतो. परंतु, आता पंपवाल्यांनी ५० रुपयांपेक्षा खाली पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे. यामुळे, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती पाहता त्यांनाही ५० रुपयांचं पेट्रोल देणे परवडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ चार महिने स्थगित ठेवण्यात आली होती. त्यानंतर २२ मार्च रोजी ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यांत १३ वेळा दरवाढ झाली असून नजीकच्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.