नागपूर : पोलीस उपनिरीक्षकाने नागपुरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला चिखलदऱ्यातील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित उपनिरीक्षकाला अटक केली आहे.
प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (३५, फ्रेंड्स कॉलनी, गिट्टी खदान) असे अटक केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. प्रदीप सिव्हिल लाईन्स येथील गडचिरोलीच्या डीआयजी कार्यालयात तैनात आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी १२ वीची विद्यार्थिनी आहे. काही महिन्यांपूर्वी ती प्रदीपकुमारच्या संपर्कात आली. ती एकटीच असल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी प्रदीपला तिच्याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते.
१३ जुलैला प्रदीपने कुटुंबीयांना मित्रांसोबत चिखलदराला जात असल्याचे सांगितले. तो विद्यार्थिनीला सरप्राइज देण्याच्या बहाण्याने चिखलदरा येथे घेऊन गेला. तेथे ते एका हॉटेलमध्ये थांबले. दरम्यान, प्रदीपने तिला गुंगीचे औषध दिले. विद्यार्थिनीला दारू पाजल्यानंतर तिच्याशी जबरदस्ती केली. तिने विरोध केल्यानंतर प्रदीप शांत झाला. आपला भांडाफोड होण्याच्या भीतीने प्रदीपने अल्पवयीन मुलीला आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे विद्यार्थिनी शांत झाली.
दुसऱ्या दिवशी प्रदीपने तिला नागपूरला तिच्या खोलीवर सोडले. जिल्ह्यात पाऊस सुरू असल्यामुळे विद्यार्थिनीचा आपल्या आई-वडिलांसोबत संपर्क झाला नाही. शुक्रवारी तिने आई-वडिलांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी प्रदीपविरुद्ध शनिवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. गडचिरोली डीआयजी कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. प्रदीपला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. प्रदीपची शिपाई म्हणून निवड झाली होती. विभागीय परीक्षा देऊन तो उपनिरीक्षक झाला आहे. यापूर्वीही तो फसवणुकीच्या प्रकरणात चर्चेत होता. त्याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.