मध्य प्रदेशात तपासासाठी गेलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 03:51 PM2023-06-10T15:51:41+5:302023-06-10T15:52:39+5:30
वाठोडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी : एक जण जखमी, इंदूरजवळील घटना
नागपूर : मध्य प्रदेशमध्ये एका प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वाठोडा पोलिस ठाण्यातील हे कर्मचारी होते. तीन कर्मचाऱ्यांपैकी एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात शोककळा पसरली आहे.
नंदू कडू (५५) असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे. सायबर गुन्ह्याशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासासाठी वाठोडा पोलिस ठाण्यातील नंदू कडू, सचिन श्रीपाद व राधेश्याम खापेकर हे इंदूरजवळ जाण्यासाठी निघाले होते. शासकीय किंवा सार्वजनिक वाहनाने न जाता ते खासगी वाहनाने निघाले. शुक्रवारी इंदूरपासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात नंदू कडू यांचा मृत्यू झाला, तर राधेश्याम खापेकर यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली. त्यांना इस्पितळात नेले असता खांदा फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने सचिनला फार दुखापत झाली नाही. ही घटना वाऱ्यासारखी पोलिस वर्तुळात पसरली.
वाठोडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक चौधरी यांनी इंदूरला संपर्क करून नेमक्या स्थितीची माहिती घेतली. येथून एक पथक पाठविण्याचीदेखील तयारी झाली. कडू यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांना नागपुरात आणण्यात येईल. यासोबत खापेकर यांनादेखील खासगी वाहनाने नागपुरात आणण्यात येणार आहे, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र कर्तव्यावर असताना पोलिस कर्मचाऱ्याचा अशा पद्धतीने जीव गेल्यामुळे संपूर्ण विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.