नागपूर : वाडीकडून रविनगर चौकाच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसने मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दुचाकी व कारला धडक दिली. अमरावती मार्गावरील भरतनगर येथे हा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालक जखमी झाला. त्याचवेळी संतप्त झालेल्या लोकांनी खासगी बसच्या चालकाला बेदम मारहाण केली.
एमएच ३१-सीक्यू ६१८१ क्रमांकाची खासगी बस वाडीकडून येत होती. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या बसने एमएच ३१, एफएल ८८३९ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी एमएच ३१, एफयू ०३६२ क्रमांकाची कार आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली बस यांच्यात अडकली. यावेळी बसमध्ये ३० हून अधिक विद्यार्थिनी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हे शहरातील एका खासगी कोचिंग सेंटरचे विद्यार्थी होते. अपघातानंतर काही वेळातच संतप्त जमावाने बस चालकाला ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तो जखमी झाला. अपघातामुळे घाबरलेल्या अनेक मुली रडू लागल्या. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.