नागपूर : पिस्तूल आणि काडतुसे विक्रीच्या आंतरराज्यीय रॅकेटने केवळ मोमिनपुराच नव्हे तर संपूर्ण शहरातील गुन्हेगारांना शस्त्रे पुरवल्याची बाब समोर आली आहे. या रॅकेटमध्ये मोमिनपुरा येथील बऱ्याच कुख्यात गुन्हेगारांना पिस्तुले आणि काडतुसे विकण्यात आली आहेत. या रॅकेटशी संबंधित आणखी एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि ४० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कौटुंबिक वैमनस्यातून खून करण्यासाठी संबंधित गुन्हेगाराने पिस्तूल आणि काडतुसे खरेदी केली होती. या रॅकेटबाबत सातत्याने होत असलेल्या खुलाशांनी पोलिसांची झोप उडवली आहे. तसेच गुन्हेगारांवर वचक आणल्याची माहिती देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या दाव्यांची हवा यातून निघाली आहे.
मोमिनपुरा येथील गेस्ट हाउसचे मालक जमील अहमद यांच्या हत्येच्या तपासादरम्यान शस्त्र विक्रीच्या या रॅकेटचा भंडाफोड झाला. या रॅकेटचा प्रमुख फिरोज ऊर्फ हाजी याने जमील खून प्रकरणाचा सूत्रधार परवेझ खान याला पिस्तूल आणि काडतुसे पुरवली होती. छिंदवाड्यातील गुन्हेगार इम्रान आलम हा फिरोजला शस्त्रे पुरवायचा. फिरोज आणि इम्रान हे अनेक वर्षांपासून हे रॅकेट चालवत होते. हे रॅकेट चालविण्यासाठी इम्रान हा कळमना येथे ६ महिने भाड्याने राहत होता. फिरोज हा मोमिनपुरा येथून ग्राहक शोधून शस्त्रे विकायचा.
या रॅकेटने मोमिनपुरा येथील गुन्हेगार नेहलला पिस्तूल आणि काडतुसेही विकली होती. तपासात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंगळवारी रात्री तहसील पोलिसांनी नेहलला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल व ४० काडतुसे सापडली. यानंतर नेहलला अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहल हा तहसील पोलिस ठाण्याच्या डीबी टीमच्या काही सदस्यांसोबत मोमिनपुरा येथे अनेकदा दिसला. त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याच्या अटकेने खुनाची मोठी घटना टळली आहे. नेहलच्या धर्तीवर शहरातील अनेक गुन्हेगारांनी या रॅकेटमधून शस्त्रे खरेदी केल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० पिस्तुले आणि १२०४ काडतुसे जप्त केली आहेत.