नागपूर : खग्रास आणि खंडग्रास अशा दाेन्ही प्रकारात दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण येत्या २० एप्रिल राेजी हाेत आहे. वर्षातील पहिले व अतिशय दुर्लभ असे हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही पण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा आनंद घेता येईल. सूर्यग्रहण दिसणार नसले तरी खगाेलप्रेमींना २२ व २३ राेजी लायरिड उल्कावर्षाव पाहण्याची संधी मात्र मिळणार आहे.
२० राेजीचे सूर्यग्रहण दक्षिण पासिफिक महासागरातून दिसेल. कंकणाकृती ग्रहणाला तिथूनच सुरवात होईल. पुढे पाश्चिम आस्ट्रेलियाच्या ठिकाणी, पापुआगिनी, इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलीप्पिनस या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाच्या सुरवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल तर मध्य काळात हे ग्रहन खग्रास दिसेल. एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे ह्याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात. पृथ्वीच्या गोल आकारामुळे आणि कमी-अधिक उंची/अंतरामुळे एकाच दिवशी कुठे कंकणाकृती तर कुठे खग्रास सूर्यग्रहण पहावयास मिळते. दशकातून एखादे वेळेसच असे दुर्मिळ हायब्रीड सूर्यग्रहण होत असते आणि शतकात ही शक्यता केवळ ३ टक्के असते. हे सूर्यग्रहण अश्विनी नक्षत्रात आणि मेष राषीत घडणार आहे. संपूर्ण ग्रहण ५ तास २४ मिनिटांचे असेल.
दरवर्षी २२, २३ एप्रिलदरम्यान दिसणारा लायरीड उल्कावर्षाव यावर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखे दरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा तारासमूहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ रोजी मोठया संख्येने दिसतो अशी माहिती, रमन विज्ञान केंद्राचे महेंद्र वाघ यांनी सांगितली.
उत्तर-पूर्व दिशेला सूर्य मावळल्यानंतर लायरा तारा समूहात वेगा ताऱ्याजवळ हा उल्कावर्षांव पाहता येईल. रात्री १० ते मध्यरात्री पर्यंत हा चांगला दिसू शकेल. ताशी १५ ते २५ उल्का दिसू शकतील, असा अंदाज आहे. हा उल्कावर्षाव थॅचर धूमकेतूमुळे दिसतो. १८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळुन गेला होता तेंव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे. पुढे जेव्हा पृथ्वीचा भ्रमणमार्ग जवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये खुप मोठा उलकावर्षाव दिसणार आहे.