नागपूर : वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांनी पांढऱ्या रंगाचा अल्बिनो कुकरी हा दुर्मिळ साप पकडून त्याला अधिवासात सोडल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास उज्ज्वलनगरात घडली आहे.
बहादुरा मार्गावरील उज्ज्वलनगरात गुरुवारी रात्री १२.३० वाजता दीपक मते यांच्या घरी पांढऱ्या रंगाचा साप दिसला. त्यांनी वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य लक्की खडोदे यांना फोनवरून साप निघाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीचे नितीश भांदककर, लक्की खडोदे, अंकित मरसकोल्हे दीपक मते यांच्या घरी पोहोचले. दरम्यान, साप घराबाहेरील खड्ड्यात गेल्यामुळे दिसत नव्हता. थोडा वेळ शोधाशोध केल्यानंतर हा साप दिसला. हा पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा अल्बिनो कुकरी प्रजातीचा असल्याचे लक्षात आले. वाइल्ड लाइन वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांनी त्या सापाला पकडून त्याला जंगलात सोडले. नागपूर शहरात खूप कमी वेळा या प्रजातीचा साप आढळल्याची माहिती यावेळी सर्पमित्रांनी दिली.
.............