नागपूर : अयोध्या येथे नवनिर्मित राममंदिरात श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेसाठी उत्साहाचे वातावरण असून दिल्ली ते गल्ली तयारी सुरू आहे. अयोध्येत प्रत्येकाला या सोहळ्याला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. हीच बाब लक्षात घेत नागपुरातील एका घरात चक्क राममंदिराची हुबेहुब प्रतिकृतीच साकारण्यात आली आहे. घरीच मंदिराची सुरेख प्रतिकृती उभारण्यात आली असून त्यावर अखेरचा हात मारण्यात येत आहे. शहरातील प्रफुल्ल माटेगावकर यांनी हा पुढाकार घेतला असून त्यांनी मेहनतीतून रामलल्लाचे मंदिर घराच्या अंगणातच उभारले आहे.
सगळ्या जगाचे लक्ष त्या सोहळ्याकडे लागले आहे. जागोजागी उत्सवाचे वातावरण असणार आहे. त्यावेळी आपण कारसेवेत सहभागी नाही होऊ शकलो नाही. पण आता काहीतरी आपले योगदान असावे या विचाराने अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती आपल्या घरीच तयार करण्याचा संकल्प केला. त्यांनी स्वत: याचे ड्रॉईंग तयार केले व फ्रेम स्ट्रक्चर निर्माण केले. मंदिर २१ फूट लांब आणि १५ फूट रूंद आहे. कळसाची उंची १० फूट आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेच्या मुहूर्तावर पूजा होणार असल्याची माहिती प्रफुल्ल माटेगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. २२ जानेवारीला दुपार नंतर मंदिर लोकांसाठी खुले असेल व घरातील राममूर्तीची प्रतिष्ठापना या मंदिरात केली जाईल.
रामलल्लाच्या चरणी छोटेसे योगदानमाटेगावकर यांना रामजन्मभूमी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी न होता आल्याची खंत होती. अयोध्येत ऐतिहासिक दिवस असताना रामलल्लाच्या चरणी छोटेसे योगदान देण्याचा त्यांनी संकल्प घेतला. अभियांत्रिकीचे कौशल्य वापरून त्यांनी खामला येथील मालवीय नगर येथील स्नेह संवर्धक सोसायटीतील घरी हे मंदिर साकारले आहे. या मंदिरासाठी १६ हिटलाॅन शीट लागल्या. फ्रेमिंग पूर्ण पाईपमध्ये केले आहे.