नागपूर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन-२०२३ चे आयोजन केले आहे. १९ फेब्रुवारी रोजी तामिळनाडूतील पट्टीपुरम येथून १५० पिको सॅटेलाईट, रॉकेटसह अवकाशात सोडले जाणार आहे. हा एक जागतिक विक्रम होणार असून, यासाठी नागपुरात झालेल्या कार्यशाळेत आदिवासी भागातील विद्यार्थी, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी व महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० सॅटेलाईट बनविले आहे.
सेंट पलोटी विद्यालयात सॅटेलाईट तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या अभियानात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर कार्यशाळेतून मुलांनी सॅटेलाईटला अंतिम रुप दिले. या अभियानात ५ ते १२ विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले पिको सॅटेलाईट ५ बाय ५ सेंटिमीटरचे असून, ते वजनाने ही खूप हलके आहे. १५० सॅटेलाईट तयार केल्यानंतर ते २२ किलो वजनाच्या रॉकेटद्वारे जमिनीपासून १० किलोमीटर उंचीवर सोडले जाणार आहे. या अभियानात महाराष्ट्रातील ५१० विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यात ५२ उपग्रह महाराष्ट्रातील विद्यार्थी तयार करीत आहे. यात सहभागी झालेल्या प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला ४ प्रमाणपत्र दिली जाणार आहे.
अशा उपक्रमामुळे भारतीय विद्यार्थी अंतराळ क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील. भविष्यात अशा मोहिमा डॉ. कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ घडविण्यात हातभार लावतील.
- डॉ. विशाल लिचडे, कोअर कमिटी सदस्य, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन