कामठी : आजीच्या घरी जेवण केल्यानंतर सात वर्षीय बालक त्याच्या वडिलांसोबत स्कूटरने घरी जायला निघाला. वाटेत विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोरात धडक दिली. त्यात बालक ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच वडिलांसमोर मृत्यू झाला तर त्याचे वडील स्कूटरसह बाजूला पडल्याने ते थोडक्यात बचावले. ही घटना कामठी शहरातील प्रबुद्धनगर परिसरात शनिवारी (दि. १९) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
जियान सुलतान अहमद (७, रा. लकडगंज, कामठी) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याची आजी (आईची आई) कामठी शहरातील वारीसपुरा भागात राहते. शनिवार रात्री तिच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. जियान व त्याचे वडील अहमद मोहम्मद जफरुद्दीन (४०) जेवण आटोपल्यानंतर एमएच-३१/बीसी-२२१२ क्रमांकाच्या स्कूटरने घरी जायला निघाले. जियान मागे बसून होता. ते कामठी शहरातील प्रबुद्धनगरात पोहोचताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-४०/बीएल-२०२१ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोरात धडक दिली. या धडकेमुळे जियान ट्रकच्या चाकाखाली आला तर त्याचे वडील स्कूटरसह बाजूला फेकले गेले. यात जियानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, त्याचे वडील थाेडक्यात बचावले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी कामठी (जुने) पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कामठी- नागपूर मार्गावरील वाहतूक ठप्पअपघात होताच कामठी-नागपूर मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी जियानचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शिवाय, ट्रकचालक रामप्रसाद कैथेल (४१, रा. वलनी खान, ता. सावनेर) याला अटक केली. ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान एक तासाचा वेळ लागला.