नागपूर : रेल्वेस्थानकावर विकले जाणारे खाद्यपदार्थ आणि शितपेय तसेच पेयजलाची गुणवत्ता तपासण्यासाठी मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे रविवारी विशेष अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार, एकाच वेळी विविध फलाटावरील स्टॉलधारक आणि वेंडरची तपासणी करण्यात आली.
सहायक वाणिज्य व्यवस्थापक हेमंतकुमार बेहरा यांच्या नेतृत्वात रविववारी सुरू करण्यात आलेल्या या विशेष तपासणी मोहिमेत २ वाणिज्य अधिकारी, ११ निरीक्षक, १५ कर्मचारी तसेच तिकिट तपासणीसांचा समावेश होता.वेगवेगळ्या फलाटावर कुणी अनधिकृतपणे खाद्यपदार्थ तसेच पेय विक्री करतात का, विविध स्टॉलवर गुणवत्तेच्या मापदंडाचे निकष पाळले जातात का, ऑनलाईन विक्रीच्या संबंधाने महसुल चोरी होते का, त्याबाबत शहानिशा करण्यात आली.
यावेळी काही अनधिकृत वेंडर आढळले. याशिवाय काही कॅटरिंग स्टॉलवर प्रवाशांकडून ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम वसुल केली जात असल्याचीही बाब अधोरेखित झाली. त्यामुळे अशांवर कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली. या तपासणी मोहिमेत काही कॅटरिंग स्टॅलवर पॅन्ट्री कारमधून परवानगी नसलेल्या ब्रॉण्डच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जात असल्याचेही उघड झाले. त्या जप्त करण्यात आल्या.
विशेष म्हणजे, सध्या तापमान चांगलेच वाढले आहे. अशा वेळी गरजू प्रवाशांना सर्वच खानपानाच्या स्टॉलवर मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनिवार्य केली असताना काही स्टॉल धारक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत नसल्याचेही उघड झाले. त्याच्यावरही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यापुढेही हे विशेष तपासणी अभियान विविध रेल्वेगाड्यांच्या पॅन्ट्री कारमध्यहे तसेच वेगवेगळ्या रेल्वेस्थानकाच्या फलाटांवर सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
प्रवाशांकडून झाली शहानिशा
खाद्यपदार्थ आणि पेयजलाचे दर निश्चिंत असताना काही वेंडर प्रवाशांकडून जास्तीची रक्कम घेत असल्याची नेहमी तक्रार होते. या संबंधाने तपासणी मोहिम सुरू असताना तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही प्रवाशांसोबत बोलून त्यांच्याकडून खाण्यापिण्याच्या पदार्थांची चव, गुणवत्ता आणि किंमत याबाबतही फिडबॅक घेतला.