नरेश डोंगरे, नागपूर : जगभरातील सर्वोच्च श्रेणींच्या गायकांमधील एक नाव, मखमली आवाजाचे धनी म्हणजे रूपकुमार राठोड. चेहऱ्यावर सतत स्मित हास्य ठेवणाऱ्या रूपकुमार यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये सप्तसूर दाैडतात, असे म्हटले जाते. रूपकुमार गीत-संगीताच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार आहेत. त्यांनी गीत-संगीताचा तो सुरेल अध्याय अनुभवला आणि वर्तमान रॅप, रिमिक्सचा काळही ते बघत आहेत. शनिवारी ‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२४’मध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी हिंदी चित्रपट आणि गीत-संगीताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटातील संगीताचा घसरणारा दर्जा संगीतप्रेमींना अस्वस्थ करीत आहे, याकडे लक्ष वेधून गीत-संगीताचा ‘तो’ सुवर्णकाळ कसा परत आणता येईल, असा प्रश्न केला असता, ‘खुशबू को फैलने का बहुत है शौक मगर, मुमकिन नहीं हवाओं से रिश्ता किए बगैर...!’ हा शेर ऐकवून त्यांनी उत्तर दिले.
श्रोत्यांनी साथ दिली तरच तसे शक्य असल्याचे ते म्हणाले. अलीकडे कर्णफाड अन् संवादहीन गाणे ऐकायला मिळते. कारण आता चित्रपटाच्या १००, २०० कोटींच्या बजेटकडे लक्ष ठेवून गीत-संगीत तयार केले जाते. आधीचे तसे नव्हते. त्यावेळी रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर, गीतकार, संगीतकार यांची संस्कृतीशी नाळ जुळलेली होती. ‘मुगल-ए-आजम’ बनत असताना ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगची तयारी झाली होती. मात्र, एका बादशहासमोर त्याच्या दासीची मुलगी (अनारकली) हे कसे काय म्हणू शकते, असा प्रश्न डायरेक्टरला पडला. त्यामुळे त्यांनी गीतकार शकिल बदायूनी यांना खटकत असल्याचे सांगून काही चेंजेस हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण गीत रेकॉर्ड झाले असल्याने शकिल त्यावेळी नाराज होऊन निघून गेले.
मात्र, सात दिवसांनी त्यांनी डायरेक्टरला ‘आपकी बात सही है, सिचुएशन में ये नहीं जचेंगा’, असे म्हणत ‘झुकना सकेगा इश्क हमारा, चारों तरफ है उनका नजारा... पर्दा नहीं जब कोई खुदा से बंदों से पर्दा करना क्या...जब प्यार किया तो डरना क्या’ असा बदल केला. पुढे हे गीत अजरामर झाले. अलीकडे तसे होत नाही. आता आधीच धून बनविली जाते आणि गीतकाराला ती शब्दबद्ध करण्यास सांगण्यात येते. हा प्रकार म्हणजे ‘पहले कब्र खोद ली और उसी नाप का मुर्दा लाइए’, असे म्हणण्यासारखा आहे. आधी एक समर्पण होते, आता व्यवसाय आहे. त्यामुळे काही वेळेसाठी काहीही चालून जाते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मात्र, आतासुद्धा अनेक चांगली गाणी निर्माण केली जात असल्याचा उल्लेख करून रूपकुमार यांनी त्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
सुकून देणारी गझल कुठे गेली?
आत्मशांती देणारी गझल कुठे गेली, असा प्रश्न केला असता त्यांनी ‘नकाब के पीछे छूप गई’ असे उत्तर दिले. सध्या कॅसेट, सीडीचा नव्हे तर डाउनलोडचा जमाना आहे. गझलेला प्रमोट करणाऱ्या कंपन्या बेपत्ता झाल्या. त्यामुळे कलावंतही गझलेपासून फटकून वागतात. नव्या पिढीला गझलेची ओळख नसली तरी ते त्यांच्या प्रेमाचा इजहार ‘तुमको देखा तो ये खयाल आया’ या ओळीतूनच करतात, असे म्हणत जगजितसिंग यांच्या जाण्यानंतर गझल झपाट्याने पडद्याआड होऊ लागल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.
भाषेवर प्रेम करा
आमचे भाषेवरचे प्रेम कमी झाले. त्याचासुद्धा कर्णप्रिय गीत-संगीत बेदखल होण्यास हातभार लागल्याचे रूपकुमार म्हणतात. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि अशाच अनेक महानगरांतील मंडळी आपल्या भाषेत बोलण्याचे टाळतात. हेच काय, फिल्मी आणि म्युझिक अवाॅर्ड फंक्शनमध्येसुद्धा इंग्रजीचा भडिमार होताना दिसतो. सगळीकडे ‘रोमन स्क्रिप्ट’चा बोलबाला आहे. त्याचमुळे ‘मोरा पिया मों से बोलत नाही’ ऐवजी ‘मेरा पिया मुंह से बोलत नहीं’ असे ऐकू येत असल्याचेही रूपकुमार मिश्कीलपणे म्हणाले. हे सर्व टाळण्यासाठी आपल्या मातृभाषेवर प्रेम वाढविण्याची गरजही त्यांनी विशद केली.