धामणा (नागपूर) : भरधाव ट्रकने कामगारांची ने-आण करणाऱ्या छाेट्या प्रवासी वाहनाला (टाटा एस मॅजिक) धडक दिली. यात एकजण गंभीर, तर दहाजण किरकाेळ जखमी झाले. जखमींमध्ये महिला कामगारांची संख्या अधिक आहे. ही घटना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात रविवारी (दि. ११) सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सूरज धानफुले (वय २५, रा. धामणा, ता. नागपूर ग्रामीण) असे गंभीर, तर निर्मला बदल (३८), दीपिका शेंडे (३५, दाेघेही रा. द्रुगधामना, ता. नागपूर (ग्रामीण), माधुरी गौरकर (४०), निर्मला मनोज टापरे (४०), नेहा बावणे (२६, तिघीही रा. गोंडखैरी, ता. कळमेश्वर), आशा निसाद (२५, रा. वडधामणा, ता. नागपूर ग्रामीण), देवानंद खडसे (२२, रा. धामणा, नागपूर ग्रामीण), सविता राजेंद्र धोटे (३५, पेठ-काळडोंगरी, ता. नागपूर ग्रामीण), मोनिका मनोहर बडगे (३४, आठवा मैल, ता. नागपूर ग्रामीण) व सविता गणेश चौधरी (३२, व्याहाड, ता. नागपूर ग्रामीण) अशी किरकाेळ जखमींची नावे आहेत.
हे सर्वजण बाजारगाव-शिवा (अडेगाव) मार्गावरील सावंगा शिवारात असलेल्या एका कंपनीत कामगार म्हणून काम करतात. ते नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी एमएच ४०/एसी-५०६४ क्रमांकाच्या टाटा एस मॅजिकने कामावर जात हाेते. धामणा येथील बसस्टाॅपवर प्रवासी असताना भरधाव ट्रकने त्या वाहनाला जाेरात धडक दिली. यात एकजण गंभीर, तर १० महिला किरकाेळ जखमी झाल्या.
अपघात हाेताच उपसरपंच मनोहर येलेकर यांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना गोंडखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे उपचार करून काहींना सुटी देण्यात आली, तर काहींवर प्रथमाेपचार करून नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.