लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त घरोघरी संविधान पोहोचावे, या उद्देशाने नाशिकमधील तरुणांनी पुढाकार घेत इलाईट सर्टिफिकेशन्स अॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्युशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी हे तरुण संविधान जागर रथ घेऊन राज्यभरात फिरून संविधानाच्या विचारांचाही जागर करीत आहे. विविध वयोगटांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताच भारतीय संविधानाची एक प्रत अभ्यासासाठी मोफत दिली जाईल. यावर आधारित प्रश्न राहतील. परीक्षा एमपीएससीच्या धर्तीवर घेतली जाणार आहे. राज्यस्तरीय परीक्षेचे पहिले पारितोषिक ३ लाख रुपये इतके असून द्वितीय पारितोषिक २ लाखाचे तर तिसरे बक्षीस १ लाखाचे राहील. यासह उत्तेजनार्थ पारितोषिक राहतील. यामध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र वितरित केले जातील.
संविधान विचारांची जागर करीत असलेल्या या तरुणांमध्ये इलाईट सर्टिफिकेशन्स अॅण्ड इनोव्हेटिव्ह सोल्युशनचे व्यवस्थापकीय संचालक आबासाहेब थोरात, सीईओ स्वप्ना थोरात यांच्यासह भीमराव चव्हाण, दीपक आचलखांब, धम्मपाल इंगोले, माधवी जांभूळकर, तुषार अहिरे, राहुल डोंगरे, आयुब परिपगार यांचा समावेश आहे.
संविधान जागर रथ नागपुरात दाखल, संविधान चौकात आज कार्यक्रम
- हा संविधान जागर रथ सोमवारी नागपुरात पोहोचला. दीक्षाभूमीला जाऊन त्यांनी सर्वप्रथम संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
- उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता संविधान चौक येथे एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील गणमान्य व्यक्ती सहभागी होतील. यावेळी परीक्षेसाठी नोंदणीसुद्धा करता येईल. त्यानंतर हा रथ वर्धेच्या दिशेने रवाना होईल. मुंबई येथे या जागर रथाचा समारोप होईल.