निशांत वानखेडे
नागपूर : दगडाची घनता ही पाण्यापेक्षा अधिक असते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ताे पाण्यात बुडताे, हा दगडाचा गुणधर्म आहे. मात्र, नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल हाेत असून हा दगड लाेकांच्या कुतुहलाचा विषय ठरला आहे.
नागपूरचे स्विमिंग काेच संजय बाटवे हे छटपूजेच्या दाेन दिवसाअगाेदर नेहमीप्रमाणे अंबाझरी तलावावर काेचिंगसाठी गेले हाेते. काठावर साफसफाई करताना एक दगड अचानक तलावात पडला. मात्र, हा दगड बुडण्याऐवजी चक्क पाण्यावर तरंगायला लागला. त्यांना याचे आश्चर्य वाटले. त्यांनी ताे दगड पुन्हा काढला आणि दुसऱ्या भागात फेकला. काही वेळ बुडात जाऊन ताे पुन्हा वर आला. त्यांनी या दगडाचा व्हिडिओ बनवला आणि मित्रांच्या ग्रुपवर टाकला. पाहता पाहता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि या दगडाला पाहण्यासाठी लाेकांची गर्दी जमू लागली. या दगडाची चर्चा थेट हिंदी महासागरात लंकेपर्यंत बांधलेल्या रामसेतूशी जाेडली गेली. त्यामुळे हा दगड कुतुहलाचा विषय ठरला आहे.
वालुकामय खडक की सिमेंटमिश्रीत दगड?
स्वत: भूगाेल विषयात एम.ए. असलेल्या बाटवे यांना मात्र याबाबत फारसे आश्चर्य वाटले नाही. या दगडाचे वजन पाच ते सहा किलाे असल्याचे त्यांनी सांगितले. हा वालुकामय दगड असू शकताे किंवा सिमेंटमिश्रीत खडक असू शकताे. वालुकामय दगडाच्या आत कालांतराने पाेकळी निर्माण हाेते व त्यात गॅस भरलेला असताे. त्यामुळे कधीकधी हे खडक पाण्यावर तरंगतात. हा सिमेंटमिश्रीत दगडही असू शकताे. छटपूजेसाठी कुणीतरी बांधकामाच्या मलब्यातून आणला असावा, अशी शक्यताही बाटवे यांनी व्यक्त केली.
आपल्या भागात असे खडक नाहीत
भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे अधिकारी आर.एच. चव्हाण यांनी प्रत्यक्ष दगड पाहिल्याशिवाय काही सांगणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते काेराडी परिसरात रांगाेळी तयार करण्यासाठी उपयाेगात येणारे खडक आहेत. हे खडक काही काळ पाण्यावर तरंगत राहू शकतात. याशिवाय रामसेतूमुळे चर्चेत असलेला ‘पुमाइस’ प्रकारचा दगडही पाण्यावर तरंगू शकताे. अनेक वर्षांच्या घर्षणाने त्यांच्यातील जड मिनरल्स निघून जातात, त्यात गॅस भरलेली पाेकळी निर्माण हाेते आणि घनता पाण्यापेक्षा हलकी हाेत असल्याने तरंगण्याचा गुणधर्म येताे. मात्र, अशाप्रकारचे दगड किंवा खडक आपल्या परिसरात आढळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामसेतूची चर्चा
तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडिओ व्हायरल हाेताच वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. श्रीलंकेपर्यंत बांधलेल्या रामसेतूच्या दगडांशी त्याची तुलना हाेऊ लागली. मात्र, त्याचे परीक्षण केल्याशिवाय सत्य काय ते सांगणे, शक्य नसल्याचे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. उल्कापाताने तयार झालेल्या लाेणार सराेवराच्या आसपासच्या दगडांमध्ये हा गुणधर्म असल्याचे बाेलले जाते. त्यामुळे धुमकेतू किंवा उल्कापाताचे तुकडे पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.