नागपूर : लोकसभा निवडणूकीमुळे शहरभरात कडेकोट बंदोबस्त असल्याचा पोलिसांकडून दावा करण्यात येत असताना एका मुलीच्या घरात शिरून तिच्यावर अनोळखी व्यक्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने दोन वेळा बचाव करत घराच्या गच्चीवर धाव घेतली व त्यामुळे ती बचावली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
३० मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास १९ वर्षीय मुलगी घरी एकटीच होती. एक अनोळखी व्यक्ती तेथे आला व त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. मुलगी पाणी आणायला आत गेल्यावर त्याने आत प्रवेश केला व घरात कुणीही नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने दोनदा स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडविले व घराच्या गच्चीवर धाव घेतली. तेथे दार लावून भर उन्हात ती बसली. आरोपी तेथून निघून गेल्यावर मुलगी घरात परतली व तिने आईवडील घरी आल्यावर त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तिचे पालक तिला यशोधरानगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले व तेथे अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. संपूर्ण वस्तीतील व आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यातून यात भोला सोमाजी नाने (२५, मस्कासाथ, ढिवरपुरा) हा आरोपी असल्याची बाब समोर आली. त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, व्ही.व्ही.मोटे, मेघा गोरखे, राहुल राठोड, गणेश गुप्ता, रामेश्वर गेडाम, अक्षय कुलसंगे, किशोर धोटे, मनिष झरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.