नागपूर : धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तिचा हात निसटला अन् ती प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे गाडीच्या गॅपमध्ये सापडली. ते दृश्य अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे होते. धावा धावा, बघा, वाचवा अशी आरडाओरड सुरू झाली.
त्या क्षणांत तिचा जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरू असताना रेल्वे कर्मचारी आणि लोहमार्ग पोलिस देवदूत म्हणून धावले अन् मदतीचा हात देऊन तिचा जीव वाचविला. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. स्वर्णिमा असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नांदखेड (अकोला) येथील रहिवासी आहे. वडील शेतकरी आहेत. तिला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. सध्या ती सदरच्या वसतिगृहात राहून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसर्या वर्षाला शिकते.
महाविद्यालयाला सुट्या लागल्याने तिने घरी जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर आली. तिला गोंदिया-अकोला महाराष्ट्र एक्सप्रेसने जायचे होते. मात्र, गाडीत गर्दी असल्याने ती बसू शकली नाही. तेवढ्यात गाडी सुटली अन् स्वर्णिमाची धावपळ उडाली. जनरल डब्यात बसण्यासाठी तिने एका हाताने दरवाजाचा लोखंडी दांडा पकडला मात्र हात सैल झाला आणि तिचा संघर्ष सुरू झाला. सुदैवाने शेवटचा डबा असल्याने गाडी पुुढे निघून गेली. ती खाली पडली. रेल्वे कर्मचारी आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय मरापे यांनी तिला तात्काळ रुळावरून फलाटावर घेतले. स्वर्णिमाच्या एका पायाला जबर जखम झाल्याने ती रक्तबंबाळ झाली. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. दरम्यान लोहमार्ग पोलिस रंजना कोल्हे, रेल्वे डॉक्टर तेथे पोहोचल्या. प्राथमिक उपचारानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सर्वच हादरले-
या घटनेची माहिती स्वर्णिमाच्या वडिलांसह वसतिगृहातील प्रमुखांना देण्यात आली. काही वेळातच वसतिगृहाच्या प्रमुख आणि विद्यार्थिनींनी रुग्णालयात गर्दी केली. ती धोक्याबाहेर असल्याचे कळल्याने सर्वांनीच त्या देवदूतांचे आभार मानले.