नागपूर : एजी.एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक 'कामबंद' आंदोलन पुकारले. यामुळे अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प झाले. घरांमधील कचराही उचलला नाही. तो तसाच साचून राहिला. रस्त्याच्या बाजूला, बाजारात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कंपनी व कर्मचाऱ्यांच्या वादात शहरातील नागरिकांना वेठीस धरले जात आहे. लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, हनुमाननगर व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. बुधवार बाजार परिसर, उमेरड रोडवरील मिरची बाजार, सक्करदरा तलाव परिसर, वंजारीनगर रोड, सिद्धेश्वर सभागृह, श्रीकृष्ण नगर चौक, हसनबाग, के.डी.के. पॉइंट, धरमपेठ बाजार, धंतोली परिसर, त्रिमूर्तीनगर, खामला यासह शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. विशेष म्हणजे हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील कचरा संकलन बुधवारपासूनच बंद असल्याने नागरिकांच्या घरातही कचरा साचून आहे. त्यामुळे घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे.
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी दोन कंपन्यावर आहेत. १ ते ५ झोनची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीकडे आहे. कचरा गाडीवरील चालक व मजुरांवर एजी. एन्व्हायरो कंपनीकडून अन्याय केला जात आहे. त्यांच्यावर खोटा आरोप करून कामावरून कमी करणे, हजेरी न लावणे, धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहे. याविरोधात कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा विदर्भ मजदूर संघाचे संयोजक मुकेश शाहू यांनी बुधवारी मनपा आयुक्तांना सादर निवेदनातून दिला होता. तोडगा न निघाल्याने कामगारांनी काम बंद ठेवले. तोडगा न निघाल्यास शुक्रवारीदेखील पाच झोनमधील कचरा तसाच पडून राहण्याची शक्यता आहे.
नोटीस न देता अचानक कामबंद
कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार नोटीस दिली नाही. कुठलीही चर्चा न करता अचानक कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे पाच झोनमधील कचरा संकलन झाले नाही. दोन झोनमध्ये दुपारी काही भागात कचरा संकलित करण्यात आला. कचरा गाडीवर जीपीएस यंत्रणा असल्याने कचरा गाडी कोणत्या वस्त्यात फिरली? किती वेळ उभी होती, याची माहिती मिळते. कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन दिले जाते. ८ तासाहून अधिक काम घेतले जात नाही. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.
- समीर टोनपे, प्रकल्प प्रमुख, एजी. एन्व्हायरो