नागपूर : नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. १४) सकाळी कामठी-कळमना मार्गावर माॅर्निंग वाॅकला गेलेल्या शिक्षकाला वेगात आलेल्या बाेलेराेने मागून जाेरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
कृष्णराव महादेवराव आरेकर (५७, रा. भूषणनगर, येरखेडा, ता. कामठी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. कृष्णराव टेकाडी (कन्हान), ता. पारशिवनी येथील नूतन सरस्वती विद्यालयात शिक्षकपदी कार्यरत हाेते. ते राेज सकाळी त्यांच्या मित्रांसाेबत कामठी-कळमना मार्गावर माॅर्निंग वाॅकला जायचे. मंगळवारी सकाळी घराकडे परत येत असताना रनाळा (ता. कामठी) शिवारात कळमना येथून कामठीच्या दिशेने वेगात आलेल्या एमएच-३१/डीके-९४६१ क्रमांकाच्या मालवाहू बाेलेराेने त्यांना जाेरात धडक दिली. त्या बाेलेराेमध्ये भाजीपाला हाेता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मित्रांनी या घटनेची माहिती लगेच कृष्णराव यांच्या कुटुंबीयांसह पाेलिसांना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी वाहन चालक प्रशांत इमोची, रा. रनाळा, ता. कामठी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.