नागपूर : धोक्याचे संकेत मिळताच लोको पायलटने प्रसंगावधान दाखविल्यामुळे नागभिड-चांदा मार्गावर एक भयावह रेल्वे अपघात टळला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रशासकीय वर्तुळाला या घडामोडीमुळे जबरदस्त हादरा बसला आहे.
उल्लेखनीय असे की, चुकीचे सिग्नल मिळाल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात घडला आणि या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू असताना दोनच दिवसानंतर स्टेशन मास्तरने पुन्हा अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. मात्र, लोको पायलटने प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला अन् अनेकांचे प्राण बचावले.विशेष म्हणजे, या घडामोडीमुळे रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली असली तरी टळलेल्या अपघाताचे वृत्त बाहेर येऊ नये म्हणून कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. मात्र, आज या संबंधाने 'लोकमत' प्रतिनिधीला स्टेशन मास्तर आणि संबंधित लोको पायलटमधील संभाषणाची क्लीप मिळाली आणि त्यामुळेच या धक्कादायक घडामोडीचे वृत्तही उघड झाले.
हाती लागलेल्या माहितीनुसार, गोंदिया मुख्यालयातील लोको पायलट विवेक वंशपाल आपल्या सहकाऱ्यांसह १९ जूनला नागभिड-चांदा फोर्टकडे ट्रेन घेऊन निघाले. ज्या स्टेशनवरून ट्रेन निघते त्या स्टेशन मास्तरकडून समोरच्या ट्रॅकवरचा संपूर्ण अहवाल (कॉशन ऑर्डर) लोको पायलटला दिला जातो. त्यात कुठल्या ठिकाणी काय काम सुरू आहे, तेथे कोणती स्पीड ठेवावी, हे सर्व नमूद असते. याच अहवालाच्या आधारे लोको पायलट ट्रेनच्या स्पीडमध्ये बदल करीत असतो.
केळझर स्टेशन परिसरात त्यांना स्टेशन मास्तरकडून ११ जुनच्या पोजिशनचा कॉशन ऑर्डर तारिख कापून १९ जूनला देण्यात आला. त्यानुसार, लोकोपायलट ९० ते १०० च्या स्पीडने गाडी घेऊन निघाले. जेथे रेल्वे ट्रॅकचे, पुलाचे काम सुरू असते तेथे जास्तीत जास्त रेल्वेगाडीचा वेग ताशी २० ते ३० किलोमिटर असायला हवा. मात्र, स्टेशन मास्तरने दिलेल्या कागदावर असे काहीही नमूद केले नसल्याने ट्रेन सुसाट धावत होती. अचानक ११८६ केएम जवळ त्यांना ट्रॅकवर काही व्यक्ती काम करताना दिसले. त्यामुळे लोको पायलट आणि सहकाऱ्यांना दरदरून घाम फुटला. मोठा अपघात होणार, हे लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या वेगावर नियंत्रण मिळवले. ही गाडी अशीच पुढे धावत गेली असती तर पुढेही २ किलोमिटर नंतर मोठा अपघात घडला असता. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे ते सर्व टळले. या नंतर सुरक्षित ठिकाणी गाडी उभी करून लोको पायलटने स्टेशन मास्तरला फोन करून या संबंधाने जाब विचारला. त्यांनी तो ऑर्डर आधी एक दिवस अगोदरचा असल्याचे सांगितले. मात्र, लिखित स्वरूपातील ऑर्डरवर ११ तारिख कापून १९ जून करण्यात आल्याचे ठासून सांगितले असता स्टेशन मास्तर 'त-त-म-म' करू लागला.
कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताची पुनरावृत्ती टळली१७ जूनला अशाच प्रकारचा हलगर्जीपणा झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्सप्रेसवर भरधाव मालगाडी आदळली आणि त्यामुळे भीषण अपघात होऊन डझनभर लोकांना जीव गमवावा लागला. ५० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आणि कोट्यवधींच्या संपत्तीचेही नुकसान झाले. या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू असताना दोनच दिवसांनंतर स्टेशन मास्तरने हा हलगर्जीपणा दाखविला. त्यामुळे नागभीड-चांदा फोर्ट मार्गावरही असाच भीषण अपघात घडला असता. मात्र, लोको पायलटने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे हा भीषण अपघात टळला.
नागपूर ते दिल्ली प्रचंड खळबळ, बाहेर मात्र गोपनियता !दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मुख्यालयापासून तो दिल्ली पर्यंत या प्रकारामुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चाैकशी सुरू करण्यात आली. मात्र, बाहेरच्या कोणत्या व्यक्तीला याबाबत माहिती होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली. मात्र, त्यासंबंधीची एक ऑडिओ क्लीप लोकमत प्रतिनिधीला आज मिळाली. त्यावरून शहानिशा केल्यानंतर या संबंधीची बरिचशी माहिती पुढे आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले आहे. पुढे आम्ही चाैकशी करीत आहोत.नमिता त्रिपाठी-विभागिय व्यवस्थापक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर.